रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सन २०२१-२०२२ च्या एकत्रित महसूल, भांडवल व वित्तप्रेषणासह रक्कम रु. ३६ कोटी २२ लाख एक हजार एकशे पंचेचाळीस इतक्या रक्कमेच्या सुधारित अंदाजपत्रकाला आजच्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली.
जिल्हा परिषदेचे वित्त व शिक्षण समिती सभापती चंद्रकांत मणचेकर यांनी जिल्हा परिषदेच्या केवळ स्वतःच्या उत्पन्नाचे व खर्चाचे सन २०२१-२०२२चे सुधारित अंदाजपत्रक सभागृहात सादर केले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव, उपाध्यक्ष उदय बने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड आदी उपस्थित होते.
सन २०२०-२०२१ मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात कोविड -१९ या महामारीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने व त्याचा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाल्याने जिल्हा परिषदेला जमीन महसूलापोटी मिळणारे अनुदान हे अत्यल्प प्राप्त झाले होते. त्यामुळे २० टक्के समाजकल्याण, १० टक्के महिला बालकल्याण, २० टक्के देखभाल दुरुस्ती, ५ टक्के घसारा निधीचा अनुशेष प्रशासनाचा आग्रह असूनही, देता आलेला नाही, असे श्री. मणचेकर यांनी सांगितले.
सन २०२०-२१ या वित्तीय वर्षातील प्रत्यक्ष जमा व प्रत्यक्ष खर्चाचा विचार करता प्रत्यक्षात दि. १ एप्रिल २०२१ रोजी आरंभीची शिल्लक रक्कम रु. १६ कोटी ८० लाख ४६ हजार आठशे पंचवीस एवढी राहिली आहे. सन २०२१-२०२२ ची सुधारित महसुली जमा रक्कम रु. १४ कोटी ६६ लाख ५४ हजार तीनशे वीस एवढी विचारात घेऊन रक्कम रु. ३१ कोटी ४७ लाख १ हजार एकशे पंचेचाळीस महसुली खर्चासाठी उपलब्ध होणार असल्याचे श्री. मणचेकर यांनी सांगितले.