(संगमेश्वर / प्रतिनिधी)
तालुक्यातील कडवई येथील एका सामान्य कुटुंबातील तरुण सोशल मीडियाचा योग्य वापर करून धमाल करत आहे. अभिजित मोहिरे असे या तरुणाचे नाव आहे. सोशल मीडियावर अभ्यासपूर्ण माहिती देणाऱ्या या तरुणाने यूट्यूब कंपनीतर्फे गोल्डन प्ले बटन पुरस्कार पटकावला आहेत.
मास्टर माईंड यू ट्यूब चॅनल चालविणारा अभिजित मोहिरे हा “गोल्डन प्ले बटन” अवॉर्ड मिळविणारा रत्नागिरी जिल्ह्यातला पहिला यू ट्यूबर ठरला आहे. गेली आठ वर्षे अभिजित यू ट्यूबच्या माध्यमातून टू व्हीलर व फोर व्हिलर गाड्यांची दुरुस्ती कशी करावी, काळजी कशी घ्यावी, कोणता पार्ट कसे काम करतो,गाड्या मॉडीफाय करणे अशा विविध विषयांवर व्हिडिओ तयार करत असतो.
अभिजितला मिळालेला पुरस्कार हा यू ट्यूब कंपनीतर्फे देण्यात आला आहे. हा पुरस्कार कोणालाही मिळत नाही किंवा पैसे देऊन ही मिळवता येत नाही. त्यासाठी आपल्या चॅनलचे दहा लाख सबस्क्राईबर पूर्ण करावे लागतात. दहा लाख सबस्क्राईब पूर्ण करणे केवळ आवश्यक नसून व्हिडिओला लोकांची पसंती असणे गरजेचे असते. यासोबत चॅनेल उत्तम प्रकारे चालू असणे आवश्यक असतें. अभिजीतने सहज गंमत म्हणून व्हिडिओ बनविण्याचा सुरू केलेला हा प्रवास आता 500 व्हिडिओपर्यंत पोहचला आहे. अभिजित क्रिएट करत असलेल्या व्हिडिओ लोकांना प्रचंड आवडत असल्याने प्रत्येक व्हिडिओला लोकं लाईक देत असतात. विविध व्हिडिओच्या माध्यमातून अभिजित जगभरातील लाखो लोकांपर्यंत पोहचला आहे.
खरंतर बी.एड.केलेला हा तरुण शिक्षक म्हणून नोकरी मिळविण्याचा प्रयत्न करत होता. मात्र भरती प्रक्रिया बंद असल्याने मनासारखी नोकरी मिळत नसल्यामुळे मोबाईल दुरुस्ती, संगणक दुरुस्तीचे कोर्स करून दुकान चालवत होता. परंतु टेक्निकल गोष्टींमध्ये असलेला त्याचा कल त्याला शांत बसू देईना. त्यामुळे गाडी समोर आली तर तिला खोलून तिचे काम कसे चालते याचं तो निरीक्षण करू लागला. स्वतःची गाडी दुरुस्त करता करता गाड्या दुरुस्तीची कामे करू लागला. त्याचे गाड्या दुरुस्त करण्याचे कौशल्य पाहून अगदी मुंबईतून लोकं खास अभिजितकडे गाड्या दुरुस्तीसाठी येत असतात. त्याचे व्हिडिओ पाहून अनेक ऑटोमोबाईल कंपन्या उत्पादनाची जाहिरात करण्यासाठी अभिजीतकडे प्रॉडक्ट पाठवत असतात. अभिजित अशा कंपन्याच्या जाहिरात आपल्या YouTube च्या माध्यमातून प्रसिद्ध करतो. अभिजीतने नुकतेच दहा लाख सबस्क्राईबरचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे त्याला यू ट्यूब कंपनीतर्फे “गोल्डन प्ले बटन” हा अवॉर्ड देण्यात आला आहे. त्याच्या या यशाबद्दल कडवई पंचक्रोशीतून अभिनंदन करण्यात येत आहे.