(रत्नागिरी)
पानवल येथे बँकेने जप्त करण्यात आलेली घर व जागा आहे. या जागेत बेकायदेशिरपणे प्रवेश करून ताबा मिळवणाऱ्या तिघांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवार, ४ जुलै रोजी घडली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीनुसार, विश्वास कुंडाजी कडू, निखिल विश्वास कडू आणि अन्य एकजण या तिघांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
बँकेने ३० जून २०२३ रोजी संशयितांची पानवल येथील जागा जप्त केली असून तिच्या देखभालीसाठी बँकेने राजेंद्र शिंदे या सिक्युरिटी गार्डची नेमणूक केली आहे. ४ जुलै रोजी राजेंद्र शिंदे तिथे हजर असताना संशयितांनी तेथील लोखंडी गेटचे कुलूप तोडून कारने बेकायदेशिरपणे जागेत प्रवेश केला. त्यांच्या या कृतीला सिक्युरिटी गार्ड राजेंद्र शिंदे यांनी विरोध केला असता संशयित आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली. याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.