(मुंबई)
अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे ३५ हून अधिक आमदार पक्षाच्या नेतृत्वाविरोधात बंड करून राज्यातील भाजपप्रणित सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. आमचाच पक्ष खरा राष्ट्रवादी असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्याचवेळी शरद पवार हेच आमचे नेते आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. अनेक ठिकाणी बंडखोरांकडून शरद पवार यांचा फोटोही वापरला जात आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी इशारा दिला आहे.
अजित पवार यांच्यासह काही विश्वासू सहकाऱ्यांनी केलेल्या बंडामुळं दुखावलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कमालीचे आक्रमक झाले आहेत. बंडखोरांपैकी कुणीही माझा फोटो कुठंही वापरू नये, असा इशारा त्यांनी दिला आहे.
‘माझा फोटो माझ्या परवानगीनंच वापरावा. ज्यांनी माझ्या विचारांशी द्रोह केला. ज्यांच्याशी माझे आता वैचारिक मतभेद आहेत, त्यांनी माझा फोटो वापरू नये. जिवंतपणी माझा फोटो कुणी वापरावा हे ठरविण्याचा मला अधिकार आहे, असं त्यांनी ठणकावलं आहे.
‘मी ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि जयंत पाटील हे ज्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहेत. त्या पक्षानं व त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीच माझा फोटो वापरावा. अन्य कुणीही माझा फोटो वापरू नये, असं त्यांनी बजावलं आहे.