(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व पर्यटकांच्या विशेष पसंतीचे पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळे येथील मोरया चौकात गेल्या काही वर्षांपूर्वी बाराव्या वित्त आयोगातून भक्त पर्यटकांना येथील गणपती मंदिर मंदिराकडे जाण्यासाठी जवळच उतरता यावे, या दृष्टीने पिकअपशेड उभारण्यात आली होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून ही पिकअपशेड वापराविना धूळ खात पडून असतानाच यंदाच्या पहिल्याच पावसाळ्यात पूर्णतः या पिकअपशेडची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्याचे लक्षात येतात शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख राजेंद्र शिंदे आणि शिवसेनेचे गणपतीपुळे शाखाप्रमुख कल्पेश सुर्वे व अन्य पदाधिकारी यांनी तातडीने एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांना संबंधित पिकअप शेडच्या दुरावस्थेची माहिती देऊन तातडीने या पिकअप शेड वरचे धोकादायक पत्रे हटवून संबंधित पिकअप शेड पूर्णतः जमीनदोस्त करावी, अशी मागणी लावून धरली होती. तत्पूर्वी त्यांनी “रत्नागिरी 24 न्यूज” ला पिकअप शेडच्या दुरावस्थेची माहिती देऊन एमटीडीसी व संबंधित अन्य खात्याने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल,असा इशारा दिला होता. त्यानंतर “रत्नागिरी 24 न्यूज” ने तात्काळ बातमी प्रसिद्धी करून आवाज उठवला होता.
या बातमीची तातडीने दखल घेऊन आज सोमवारी गणपतीपुळे एमटीडीसी चे निवासी व्यवस्थापक वैभव पाटील यांनी तात्काळ आपल्या कर्मचाऱ्यांना मोरया चौकात पाठवून पिकअपशेडच्या दुरावस्थेतील धोकादायक पत्रे हटवून पूर्णतः छप्पर मोकळे केले आहे. तसेच येत्या दोन दिवसांत च पिकअपशेड संपूर्ण जमीनदोस्त करून जागा मोकळी करणार असल्याचे आश्वासन एमटीडीसी चे निवासी व्यवस्थापक वैभव पाटील यांनी शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख राजेंद्र शिंदे आणि कल्पेश सुर्वे यांना दिले आहे. त्यामुळे “रत्नागिरी 24 न्यूज” चा आवाज आणि शिवसेनेचा ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा याची तात्काळ दखल घेऊन एमटीडीसीने पिकअप शेड चे धोकादायक पत्रे हटविल्याने गणपतीपुळे परिसरातील स्थानिक रिक्षा व्यावसायिक, व्यापारी,पर्यटक आणि स्थानिक ग्रामस्थ यांनी समाधान व्यक्त केले आहे.
खऱ्या अर्थाने पिकअपशेडच्या दुरावस्थेची तातडीने गंभीर दखल घेऊन एमटीडीसी चे निवासी व्यवस्थापक वैभव पाटील यांनी आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत संबंधित पत्रे हटविण्याचे काम मार्गी लावल्याने शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख राजेंद्र शिंदे आणि गणपतीपुळेचे शाखाप्रमुख कल्पेश सुर्वे व अन्य पदाधिकारी यांनी त्यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.