(जैतापूर / वार्ताहर)
रेवस- रेड्डी सागरी महामार्गावरील राजापूर तालुक्यातील जैतापूर येथे तीव्र चढावावरती झिगझॅक पद्धतीने स्पीड बेकर टाकण्यात आले आहेत या स्पीड ब्रेकरमुळे लोडच्या गाड्या चढावाला असताना अनेक वेळा मागे येण्याचे प्रकार घडत आहेत. तसेच उतारावर किंवा चढावावर असताना अनेक वाहन चालक स्पीड ब्रेकर वाचविण्यासाठी गाड्या झिगझॅग पद्धतीने चालवत असल्याने या वाहन चालकांचा पादचारांना तसेच समोरून येणाऱ्या अन्य वाहन चालकांना धोका संभवतो. या स्पीड ब्रेकरमुळे अनेक वेळा अपघात झालेले असून भविष्यामध्ये एखादा मोठा आणि गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सागरी महामार्गावरील या उतारावर स्पीडब्रेकरची आवश्यकता आहे का? आत्ता ज्या पद्धतीने स्पीड ब्रेकर टाकण्यात आले आहे ते टाकण्याचे कारण काय? आणि नियमानुसार ते टाकण्यात आले आहेत का? याचीही माहिती मिळण्यास विनंती आहे. आमच्या माहितीप्रमाणे ते धोकादायक असून ते तात्काळ काढून टाकावे अशी विनंती पत्रकार राजन लाड यांनी शासनाच्या आपले सरकार या पोर्टलच्या माध्यमातून प्रशासनाकडे केली आहे.
पुढील एक महिन्यात हे स्पीड ब्रेकर काढून न टाकल्यास येणाऱ्या स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट 2023 रोजी स्पीड ब्रेकर काढून टाकण्यासाठी नाईलाजास्तव आंदोलन करावे लागेल असेही या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. हीच तक्रार ई-मेलच्या माध्यमातून कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी रत्नागिरी, जिल्हा पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांच्याकडेही करण्यात आली आहे. अनेक वाहनचालकांना त्रासदायक ठरणारे हे स्पीड बेकर काढून टाकावेत असा ठराव जैतापूर ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला असून तसा पत्रव्यवहारही संबंधित विभागांकडे करण्यात आल्याचे जैतापूर सरपंच राजप्रसाद राऊत यांनी म्हटले आहे.