(नाशिक / प्रतिनिधी)
गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतांना सेवेकर्यांनी वैयक्तिक काही न मागता राष्ट्रहित आणि विश्वकल्याणासाठी प्रार्थना करावी असे आवाहन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांनी केले. सेवामार्गाच्या गुरुपौर्णिमा महोत्सवाला प्रारंभ झाला असून आज शुक्रवार दि. 30 जून रोजी त्र्यंबकेश्वर येथील गुरुपीठात हजारो सेवेकर्यांनी परमपूज्य गुरुमाऊलींचे दर्शन, आशीर्वाद घेतले आणि श्री स्वामींच्या मूर्तीचे पूजन करून गुरुपद स्वीकारण्याची प्रार्थना केली. यावेळी गुरुमाऊलींनी सेवेकर्यांना संबोधित केले.
गुरुमाऊली म्हणाले की, कलियुगाचे चालक, मालक व पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. तेच गुरु, सद्गुरु, परमगुरु, परात्पर गुरु आणि गुरुतत्त्वही तेच आहेत. गुरुतत्त्व संपूर्ण ब्रह्मांडाला व्यापून दशांगुले उरले आहे. त्यामुळे अंतर्यामी असलेल्या महाराजांना तुमच्या समस्या, प्रश्न सांगण्याची आवश्यकता नाही. दररोज 11 माळा श्री स्वामी समर्थ जप, श्री स्वामी चरित्राचे क्रमश: 3 अध्याय आणि पंचमहायज्ञ ही अल्पशी सेवा नियमितपणे केल्याने महाराज कोणतेही प्रश्न शिल्लक ठेवत नाहीत. त्यामुळे महाराजांच्या चरणी नतमस्तक होताना सर्वांचे भले व्हावे, राष्ट्रहित आणि विश्वकल्याण व्हावे अशी प्रार्थना करा, दुसर्यांचे चांगले चिंतले तर आपलेही चांगले होते हा कानमंत्र गुरुमाऊलींनी सेवेकर्यांना दिला.
गुरुपूजन दर्शन सोहळ्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येने सेवेकरी दाखल होत असून शनिवार दि. 1 जुलै रोजी गुरुपीठात परमपूज्य गुरुमाऊली श्री.आण्णासाहेब मोरे यांच्या पावन उपस्थितीत गुरुपूजन-दर्शन सोहळा होणार आहे. शुक्रवार दि. 30 जून रोजी गुरुदर्शनासाठी सेवेकर्यांची गुरुपीठामध्ये प्रचंड गर्दी उसळली होती.