(रत्नागिरी / प्रतिनिधी)
हातखंबा येथील भाईशेठ मापुस्कर आर्ट्स कॉमर्स संयुक्त ज्युनिअर कॉलेजमध्ये आषाढी एकादशीच्या निमित्ताने ‘ अभंगवाणी’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी बोलताना प्रा. सुभाष रानमाळे यांनी विद्यार्थ्यांनी विद्यार्थीदशेतच संत साहित्याचा अभ्यास करावा. समाजोद्धाराचे कार्य करणाऱ्या संतांची शिकवण आचरणात आणली पाहिजे. आज भौतिक सुखाच्या मागे लागलेल्या समाजाला मन:शांतीची गरज आहे. आणि ती केवळ संत साहित्यातूनच मिळू शकते असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही. जी. परीट होते. प्रारंभी स्वागत प्रा. सौ. मनस्वी जाधव यांनी तर प्रास्ताविक प्रा. श्रीमती अनिता पाटील यांनी केले.
या ‘अभंगवाणी’ कार्यक्रमानिमित्त प्रारंभी ‘ज्ञानदेवे रचिला पाया…’ या भित्तीपत्रकाचे उद्घाटन प्राचार्य व्ही. जी. परीट सर हस्ते करण्यात आले. या भितीपत्रकाद्वारे विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत जनाबाई इत्यादी संतांची माहिती संकलित करून संत चरित्राचे महत्त्व दाखवून दिले. यासाठी इयत्ता बारावीच्या स्मित सनगरे, मधुमंजिरी खानविलकर, सानिका सनगरे, रिया सनगरे, सिद्धी गोताड, दीक्षा कळंबटे, पूर्वा गावडे इत्यादी विद्यार्थी विद्यार्थिनींनी लेखन केले.
‘अभंगवाणी’ या कार्यक्रमात प्रा. सुभाष रानमाळे यांनी संत साहित्याचे महत्त्व विशद करून संत तुकाराम व संत जनाबाईंचे अभंग गायिले. त्याचबरोबर इयत्ता बारावीच्या मनीषा इटकर, प्राची बोंबले, प्रणव आंबेकर, यश सनगरे, मधुमंजिरी खानविलकर, साध्वी डांगे, यश डांगे, विराज पवार, सानिया सनमरे इत्यादी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी संतांच्या विविध रचना सादर केल्या.
या कार्यक्रमाला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रा. सौ. अनन्या पवार यांनी तर सूत्रसंचालन इयत्ता बारावीची विद्यार्थिनी कु.साध्वी डांगे हिने केले..