त्रिपुरामध्ये रथयात्रेदरम्यान मोठी दुर्घटना झाल्याची घटना घडली आहे. त्रिपुरा राज्यातील उनाकोटी येथे ही घटना घडली आहे. उनाकोटी येथील चौमुहनी परिसरातून रथयात्रा जात असताना रथाचा विद्युत वाहक तारांना स्पर्श झाल्याने शॉक लागून दोन लहान मुलांसह सहा जणांचा मृत्यू झाला, तर १८ जण वीजप्रवाहामुळे होरपळून जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाल्याची स्थिती निर्माण झाली. सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या रथयात्रेत लोकांची मोठी गर्दी होती. रथयात्रा मिरवणुकीदरम्यान ही दुर्घटना घडल्याने घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. ‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, उनाकोटी येथील चौमुहनी परिसरात रथयात्रा काढली होती. मिरवणूक सुरू असतानाच या रथावर एक विद्युत वाहक तार पडली. यावेळी रथावर किमान २० लोक बसले होते. विजेचा धक्का बसून यातील सहा जणांचा मृत्यू झाला तर अनेक जखमी झाले.
ज्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या शरीराला आगेने मोठ्या प्रमाणात वेढले होते. लोकांचा ओरडा ऐकून अनेक जण मदतीसाठी पुढे आले पण, त्यांना मदत करता आली नाही. हा रथ 133 केव्ही इतका विद्युत प्रवाह असणाऱ्या तारेच्या संपर्कात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या दुर्घटनेवर त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी शोक व्यक्त केला असून मृतांच्या नातेवाईकांप्रति सहवेदना व्यक्त केली आहे.
रथ थेट विजेच्या तारेशी कसा संपर्कात आला याचा शोध घेण्याचा प्रयत्न पथक करत आहे. त्रिपुरात भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेच्या एका आठवड्यानंतर उलटी रथयात्रा काढली जाते. यामध्ये देवाचा रथ मागून ओढला जातो. भगवान जगन्नाथ यांच्यासोबत भगवान बलभद्र आणि बहीण सुभद्रा रथावर स्वार असतात.
विद्युत वाहिनी तार रथावर पडल्याने रथालाही आग लागली आणि यामध्येही काही लोक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सर्व जखमींना सुरुवातीला कुमारघाट रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यानंतर तेथून सर्वांना उनाकोटी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोललं जात आहे.