(मुंबई)
यंदाही मुंबईत घरगुती गणेशमूर्तींवर उंचीचे बंधन कायम ठेवण्यात आले आहे. येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने भाविक, मूर्तिकार आणि दुकानदारांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार गणेश मूर्तींची उंची आणि विसर्जन यावरील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.
घरगुती गणेश मूर्तींची उंची ४ फुटापर्यंत असावी. त्या शाडू किंवा अन्य पर्यावरणपूरक साहित्यानेच बनविलेल्या असाव्या. सर्व घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करावे. कमी उंचीच्या सार्वजनिक गणेश मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यास प्राधान्य देण्यात यावे. आतापर्यंत मूर्तीकारांच्या मंडपांसाठीच्या परवानग्या असंगणकीय पद्धतीने देण्यात येत होत्या. मात्र, आता यासाठी संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे. मूर्तीकारांनी या प्रणालीद्वारे विभाग कार्यालयात अर्ज करावे. यंदाच्या गणेशोत्सवासाठी मूर्तीकारांनी यापूर्वीच परवानगी घेतली असल्यास, त्यांना नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही, असे या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केले आहे.
त्याचबरोबर गणेशमूर्ती दुकानदारांना विभाग कार्यालयामार्फत परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी त्यांना विभाग कार्यालयाची परवानगी घावी लागणार आहे. मूर्तीकारांना महानगरपालिकेत प्रमुख निरिक्षक (दुकाने व आस्थापना) खात्यात आणि अनुज्ञापन अधीक्षक खात्यामार्फत परवाना प्राप्त करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.