गणपतीपुळे- वैभव पवार
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थस्थळ व पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळे येथील समुद्रात गुरूवारी सांगली बसस्थानक येथील तरुणाचा बुडून मृत्यू झाला. तर त्याच्यासमवेत असलेल्या एका सहकारी मित्राला वाचविण्यात गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावरील असणारे गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक व स्थानिक व्यावसायिकांना यश आले. प्रणेश मुकुंद वसगडेकर, वय 23 रा. सांगली असे या तरूणाचे नाव आहे तर पृथ्वीराज पाटील, वय 25 असे वाचविण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
गणपतीपुळे येथे सांगली व कोल्हापूर येथील चार मित्र बुधवारी सायंकाळी गणपतीपुळे येथे आले होते. यावेळी गणपतीपुळे येथे एका खाजगी लॉजमध्ये त्यांनी निवास केल्यानंतर गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास त्यांनी गणपतीपुळे समुद्रात आंघोळीसाठी जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळी आंघोळीसाठी यातील दोन तरुण उतरले असता त्यांनी खोल समुद्राच्या पाण्यात जाण्याचा प्रयत्न केला त्या मधील प्रणेश वसगडेकर, वय 23 याने समुद्राच्या खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न केला मात्र प्रणेश वसगडेकर हा खोल समुद्रात गेल्याने गटांगळ्या खाऊ लागला या वेळी समुद्रकिना-यावर असलेले त्याचे मित्र ओंकार मेहतर व 28 कोल्हापूर व वैभव जगताप 24 रा. सांगली, यांनी आरडाओरड केल्याने गणपतीपुळे ग्रामपंचायतचे ड्युटीवर असणारे जीवरक्षक रोहित चव्हाण अनिकेत चव्हाण, विक्रम राजवाडकर , उमेश म्हादये, विशाल निंबरे आदींनी समुद्रात उड्या घेऊन दोन्ही युवकांना वाचण्याचा प्रयत्न केला.
त्यातील प्रणेश वसगडेकर पाण्यात गेल्याने गटांगळ्या खात होता यावेळी त्याला बाहेर काढण्याचाश प्रयत्न केला गेला मात्र त्याला पाण्याबाहेर बाहेर काढल्यानंतर त्याची प्रकृती गंभीर असल्याने जीवरक्षकांनी त्याच्या नाकातोंडात गेलेले पाणी काढण्याचा प्रयत्न केला त्यानंतर देवस्थानच्या अंबूलस ने तातडीने त्याला मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले तर पृथ्वीराज पाटील याला सुरक्षितरीत्या पाण्याबाहेर काढले. यावेळी जीवरक्षकांच्या मदतीसाठी धाडसी तरुण विश्वास सांबरे सह स्थानिक फोटो व्यवसायिक रुपेश पाटील अक्षय कनगुटकर , वैभव पवार , नितीन म्हादये, गंगाराम शिंदे, किसन जाधव आदींनी विशेष प्रयत्न केले आणि या सर्वांना वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र प्रणेश वसगडेकर याला वाचवण्याचा प्रयत्न सुरू असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
गणपतीपुळे पर्यटन स्थळ सुरु झाल्यापासून पर्यटकांची चांगलीच वर्दळ सुरू आहे मात्र समुद्रकिनाऱ्यावर मौजमजा करण्यासाठी उतरणारे पर्यटक अतिरेक करण्याचा प्रयत्न करतात. त्यातील आति उत्साही तरुण समुद्राच्या खोल पाण्यात जाऊन पोहण्याचा प्रयत्न करतात मात्र हाच प्रयत्न गुरूवारी दोन तरुणांच्या जीवावर बेतला असून त्याचा मृत्यू झाला आहे. यांतील बुडणाऱ्या दोन्ही ही तरूणांना जीवरक्षकांनी खोल समुद्राच्या पाण्यात जाऊ नका,असे सांगितलेले असताना त्यांनी उद्धटपणे उत्तर देऊन आम्हाला चांगल्या प्रकारे पोहता येते असे सांगितले होते. मात्र ,अतिरेक करणाऱ्या एकाला अखेर मृत्यूला सामोरे जाण्याची वेळ येऊन ठेपली. याला जबाबदार कोण? असा प्रश्न आता स्थानिक ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. याविषयीची माहिती गणपतीपुळे पोलीस ठाण्याला मिळाल्यानंतर गणपतीपुळे पोलीस ठाण्याचे मधुकर सलगर व सागर गिरीगोसावी यांनी पंचनामा करून मयत झालेल्या तरूणाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रत्नागिरी येथे जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठिवला. या घटनेचा अधिक तपास गणपतीपुळे पोलीस ठाण्याचे हवालदार राहूल जाधव करीत आहेत.