(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे तीर्थक्षेत्र आणि परिसराला काल रात्रीपासूनच पावसाने जोरदार झोडपल्याने येथील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. यातच आज समुद्राच्या भरतीचे पाणी व पडलेल्या पावसाचे पाणी एकत्र झाल्याने भंडारपुळे येथील छोट्या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर आल्याचे पाहायला मिळत होते.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेले दोन दिवस गणपतीपुळे आणि परिसरात पावसाचा जोर वाढला असून आज बुधवारी दिवसभर पाऊस जोरदार पडत आहे. त्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने तसेच या ठिकाणी असणाऱ्या छोट्या-मोठ्या सर्वच नद्या दुथडी भरून वाहत असल्याने या ठिकाणी पावसाने चांगले हजेरी लावल्याचे दिसते. मात्र या पावसामुळे पर्यटनावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
गेले दोन दिवस गणपतीपुळे आणि परिसरात वादळ वाऱ्यासह मोठ्या पाऊस होत असल्याने गणपतीपुळे तीर्थक्षेत्राकडे पर्यटकानी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. यातच गेले दोन दिवस रात्री पडणाऱ्या पावसामुळे समुद्राचे पाणी भंडारपुळे येथील पुलावरून मोठ्या प्रमाणात आज वाहताना दिसून येत होते. त्यामुळे गणपतीपुळे येथून रत्नागिरीकडे जाणारी तसेच रत्नागिरीतून गणपतीपुळेला येणारी वाहतूक टप्प झाली होती.
गणपतीपुळे परिसरात असाच पाऊस सलग पडत राहिला तर गणपतीपुळे आणि परिसरात मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य होऊ शकते. त्याचप्रमाणे गणपतीपुळे आपटा ते एसटी स्टँड परिसर या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने गटर लाईन काढली नसल्याने सर्व पाणी रस्त्यावरूनच वाहत असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती, काचेच्या बॉटल, प्लास्टिकच्या बॉटल, प्लास्टिक पिशव्या, इतर घाण आल्याचे दिसून येत होती. याबाबत ग्रामपंचायतीने संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाजवळ संपर्क साधावा व गटार लाईन काढून येथील ग्रामस्थांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करावे अशी मागणी येथील ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे.