(खेड)
गोव्याहून मुंबईच्या एकाच दिशेने जाणाऱ्या तीन ट्रेलरची एकमेकांना धडक बसून झालेल्या विचित्र अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक साडेतीन तास ठप्प होती. हा अपघात खेड तालुक्यातील भोस्ते घाटात मंगळवारी (२७ जून) सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान झाला. क्रेनच्या सहायाने ट्रेलर बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
पहिला ट्रेलर घाट उतरत असताना पाठीमागून आलेल्या ट्रेलरने त्याच्या बाजूने पुढे जाण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात महामार्गाच्या दुभाजकावर त्याचे चाक चढले. त्या ट्रेलरच्या चालकाने गाडीवर नियंत्रण मिळवत पुन्हा मुख्य रस्त्यावर गाडी आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याच वेळी त्याच्या पाठोपाठ येणाऱ्या तिसऱ्या ट्रेलरने पहिल्या ट्रेलरला चालक केबिनला जोरदार धडक दिली.
या अपघातामुळे दोन्ही ट्रेलर रस्त्यात अडकून थांबले. त्यामुळे गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. वाहतूक पोलिस व स्थानिक पोलिस अधिकारी पोहोचल्यानंतर वाहतूक दुसऱ्या रस्त्यावरून वळवण्यात आली. दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास क्रेनच्या सहायाने ट्रेलर बाजूला करण्यात आले.