(नागपूर)
रागात एखादी व्यक्ती काय करेल याचा काही नेम नाही. आता नागपुरात अशीच धक्कादायक घटना घडली आहे. रोहित्राला (डीपी) कवेत घेत एका पोलिसाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरातील पेन्शन नगर परिसरात घडली आहे. काशिनाथ कराडे असं या पोलिसाचं नाव असून ही संपूर्ण धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
मिळालेल्या माहितीप्रमाणे काशिनाथ कराडे मूळचे सातारा जिल्ह्याचे असून नागपुरात पोलीस कर्मचाऱ्यांसह एका भाड्याच्या घरात राहात होते. त्यांची नेमणूक पोलीस मुख्यालयात होती. काशिनाथ कराडे गेले काही दिवस तणावात होते. काल दुपारी ते घराबाहेर निघाले आणि घराजवळील महावितरणचे रोहित्र (लोखंडी बॉक्स) उघडून त्याला स्पर्श करत आत्महत्या केली.
महावितरणच्या रोहित्रमध्ये अत्यंत जास्त दाबाचा वीज प्रवाह असतो. त्यामुळे काशिनाथ यांनी रोहित्राला स्पर्श करताच त्यांना विजेचा जोरदार झटका बसला आणि काही वेळ त्याला चिटकून राहिल्यानंतर काशिनाथ खाली कोसळले. ही घटना पाहणाऱ्यांनी लगेच धाव घेऊन लाकडी काठीच्या मदतीने काशिनाथ यांना बाजूला करण्याचे प्रयत्न केले. मात्र त्या आधीच त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. या दुर्दैवी घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.