(नवी दिल्ली)
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती संभाजी राजे यांच्या हत्येबद्दल मोठं धक्कादायक विधान केलं आहे. छत्रपती संभाजी राजे यांना मनुस्मृती प्रमाणे शिक्षा देण्यात आली होती, तसेच त्यांच्या हत्येत हिंदू देखील सहभागी होते असे दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, देशात सध्या जुन्या राजांची उदाहरणं देऊन समाजात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण ही खरी वस्तुस्थिती नाही. औरंगजेबाने त्याच्या भावाचीही हत्या केली, पण त्यात क्रुरता नव्हती. शिवाजी महाराजांच्या बाबतीतही क्रुरता दिसली नाही. पण संभाजी महाराजांसोबत केलेली क्रुरता वेगळ्या प्रकारची आहे. औरंगजेबाला ही क्रुरता कोणी करायला लावली, का करायला लावली हा संशोधनाचा विषय आहे, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
प्रकाश आंबेडकर म्हणाले अखंड भारतीय उपखंडावर औरंगजेबाने तब्बल ५४ वर्षे राज्य केलं, हा इतिहास तुम्ही नाकारू शकत नाही. तो सुफी म्हणूनच गेला हे देखील नाकारता येत नाही. त्याने अनेक चांगल्या गोष्टी केल्या हे आपण नाकारू शकत नाही, असे देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, औरंगजेबने संभाजी महाराजांना जो दंड दिला त्याची आम्ही निंदा करतो. संभाजीराजेंची हत्या मुस्लिम धर्माशी सहमत नाही, त्यांना मनुस्मृती प्रमाणे शिक्षा देण्यात आली. आपण औरंगजेबचा जितका निषेध करतो तितका, शिर्के, आबा भटजी यांचाही निषेध करायला हवा. हिंदू-मुस्लिम, जैन-हिंदू हा वाद जो देशात होतोय त्याबाबत जो इतिहास दिला जातो तो बरोबर नाही. संभाजीराजे यांच्या हत्येत हिंदू सहभागी होते असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.