( देवरुख )
शहरातील सलून व्यापारी व संगमेश्वर तालुक्यातील मोर्डे ग्रामपंचायतचे माजी सदस्य प्रकाश सदाशिव चव्हाण (वय वर्ष ५४) यांनी रविवारी रात्री घराच्या मागील बाजूस असलेल्या आंब्याच्या झाडाला ११.१५ च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली.
प्रकाश चव्हाण यांनी पहिले एसी कटिंग सलून सुरू करून विविध प्रकारच्या केस कापण्याच्या स्टाईल्स देवरुखमध्ये पहिल्यांदा आणल्या. बारा वर्षांपूर्वी व्यवसायाला सुरुवात करून स्वतःची वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली. तब्बल सहा कात्री हातात घेऊन केस कापण्याची वेगळी लकब त्यांची होती. हसतमुख असे ते व्यावसायिक होते. गावच्या राजकारणातही ते अग्रेसर राहून काम करत असत. यातूनच ग्रामपंचायतीच्या सदस्य पदी देखील ते निवडून आले होते.
रविवारी रात्री घरातील व्यक्तींशी ते गप्पा मारत होते. अचानक घरातून बाहेर पडून गेले. घरी परत न आल्याने व घरच्या त्यांच्या खोलीत शोध करून घरच्यांनी अन्य ठिकाणी शोधाशोध सुरू केली.
घराच्या मागील बाजूस असलेल्या आंब्याच्या झाडाला साडीने गळफास लावलेल्या स्थितीत घरच्यांना ते ११.३० च्या सुमारास दिसून आले. तात्काळ त्यांना देवरुख ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. वैद्यकीय सूत्रांनी तपासणी करून चव्हाण हे मृत असल्याचे घोषित केले. यानुसार त्यांचा मुलगा मयूर यांनी देवरुख पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
देवरुख पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. देवरुख ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून सोमवारी सकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. चव्हाण यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. याबाबत अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन जाधव करत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी दोन विवाहित मुलगे एक मुलगी दोन सुना व दोन नातवंडे असा परिवार आहे.