(चिपळूण)
खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी करताना दोघांना वन विभागाने ताब्यात घेतले. यात एका महिलेचा समावेश आहे. दापोली व चिपळूण वन परिक्षेत्रातील वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लोटे येथे महामार्गावर सापळा रचून ही कारवाई केली. मिलींद वसंत सावंत (वय-५५ रा, मालाड, मुंबई) व मिना मोहन कोटिया (६२ रा. लोटे, ता. खेड) या दोघांकडून खवले मांजराचे ०.९३० किलोग्रॅम इतके खवले जप्त केले.
याबाबत माहिती अशी की, लोटे येथे दोन अज्ञात व्यक्ती खवले मांजराच्या खवल्यांच्या विक्रीसाठी येत असल्याची माहिती विभागीय वन अधिकारी चिपळूण यांना मिळाली होती. याप्रमाणे लोटे येथे महामार्गावर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सापळा रचला.
लोटे येथे काल रविवारी सायंकाळच्या सुमारास महामार्गावर दोन संशयित व्यक्ती आढळून आल्या. अधिक चौकशी केली असता सदर दोन व्यक्तींच्या बॅगेमध्ये खवले मांजराची खवले असल्याचे व ते विक्रीसाठी तेथे आले असल्याचे आढळून आले. यानंतर दोघांना वन विभागाने ताब्यात घेतले.
पुढील तपास पी. जी. पाटील परिक्षेत्र वनअधिकारी दापोली व राजश्री किर परिक्षेत्र वनअधिकारी चिपळूण हे करीत आहेत.