(रत्नागिरी)
बेदरकारपणे दुचाकी चालवून ट्रकच्या मागील डिझेल टाकीला धडक देत अपघात करत स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालकाविरोधात नाटे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघाताची ही घटना शनिवार २४ जून रोजी सायंकाळी ४.४५ वा. आडिवरे स्मशानभूमीच्या वळणावर घडली आहे. सिद्धेश शांताराम पळसमकर (२१, रा. राजापूर) असे मृत दुचाकी चालकाचे नाव आहे. याबाबत ट्रक चालकाने नाटे पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, शनिवारी सायंकाळी ते आपल्या ताब्यातील ट्रक (एमएच ०७- एएक्स ०४७१) मधून पावस येथे आंब्याची कलम भरून तळेबाजार ते देवगड जाणाऱ्या सागरी मार्गाने जात होते. त्याच सुमारास सिद्धेश पळसमकर हा आपल्या दुचाकीवर अन्य दोघांना घेऊन धारतळेकडून येत होता. ही दोन्ही वाहने आडिवरे येथील स्मशानभूमी वळणावर आली असता सिद्धेशचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि त्याने ट्रकच्या ड्रायव्हरबाजूकडील पाठीमागे असलेल्या डिझेल टँकला धडक देत अपघात केला.
या अपघातात सिद्धेशचा मृत्यू झाला असून त्याच्या गाडीवर मागे बसलेले दोघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी नाटे पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास नाटे पोलिस करत आहेत.