(नवी दिल्ली)
देशात जातनिहाय जनगणना झाली तरच ओबीसी समाजाला आपले हक्क मिळतील. तेव्हाच आपल्या देशाची सहिष्णू, सौहार्दपूर्ण, धर्मनिरपेक्ष देश म्हणून प्रतिमा कायम राहील. देशात जातनिहाय जनगणना होत नाही, तोपर्यंत आपला लढा निकराने सुरू ठेवावा लागेल, असे प्रतिपादन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केले आहे.
देशाचे माजी पंतप्रधान स्व. व्ही. पी सिंह यांच्या जयंतीनिमित्त दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत “सामाजिक न्यायाचा वारसा” हा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत दिवंगत व्ही. पी सिंह जयंती साजरी करण्यासाठी आज इथे उभा आहे, याचा मला अभिमान वाटतो. आज व्ही. पी. सिंह यांची जयंती आहे. मात्र, त्यांचे योगदान लोकांना का आठवत नाही, हा मोठा प्रश्न आहे. मागास समाजातील लोक त्याला का विसरले. हा चर्चेचा विषय असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
भुजबळ म्हणाले की, सरकार इम्पेरिकल डेटासाठी सर्व नागरिकांचे जात आणि आर्थिक सर्वेक्षण करण्यास तयार नाही. न्यायालयांनीही राज्यांना अशी जनगणना करण्यास मनाई केली आहे. आता २०३१ पर्यंत जनगणनाही पुढे ढकलण्यात येणार असल्याच्या बातम्या येत आहेत. समतेवर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांनी आतापासून आरक्षणविरोधी लोकांबरोबर संघर्ष करावा लागणार आहे. संपूर्ण देशात जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. ही मागणी पूर्ण होईपर्यंत हा लढा निकराने सुरू ठेवावा लागेल.