रत्नागिरी : स्व. आमदार कुसुमताई अभ्यंकर या कोकणातील राजकारण आणि समाजकारण यातील झुंझार व्यक्तिमत्व होते. त्या रत्नागिरी मतदार संघातून दोनदा आमदार म्हणून निवडून आल्या. त्यांनी समाजाच्या सर्व थरात मिसळून विकास कामे होण्यासाठी धडपड केली. अत्यंत बिकट, भौगोलिकदृष्टया कठीण आणि अवघड वाटेने गावागावात जाऊन तेथील समाजाला शिक्षण आणि त्यांचे हक्क मिळूवून देण्यासाठी आणि यातूनच तळागाळातून विकास घडण्यासाठी कार्य केले. त्यांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात यासाठी त्यांच्या चाहत्यांनी कुसुमताई सहकारी पतसंस्था स्थापन केली. पतपेढी च्या या वृक्षाची मुळे आता आर्थिकतेच्या भुमिमध्ये घट्ट होत असून त्याचाच भाग म्हणून बुधवार दिनांक १ सप्टेंबर २०२१ रोजी पतपेढी च्या वाटद खंडाळा नूतन शाखेचे उद्घाटन होत आहे.
स्व. कुसुमताई यांनी साक्षरता, वीज उपब्धता, रस्ते बांधणी, पाणी पुरवठा अशा कामांना गती देणे आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांची माहिती घेऊन आपल्या आमदार पदाचा उपयोग विकासासाठी व्हावा, यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. महिलांसाठी आरक्षित मतदार संघातून निवडणुक लढवून त्या जिंकून आल्या. कामाच्या आणि विकासाच्या मार्गाने त्यांचा विचार पुन्हा मतदारसंघातून होऊन त्या परत उमेदवार ठरल्या आणि निवडून आल्या. कोकणातील अप्रगत भागात विकास घडवून जनसामान्यांपर्यंत शासनाच्या विविध योजना कार्यान्वित करून कोकणाला लाभ मिळवून देण्यात स्व. कुसुमताईंचा मोलाचा वाटा आहे. या बरोबरच त्या उत्तम लेखिका होत्या. सर्वच साहित्य प्रकार त्यांनी हाताळले. कादंबरी लेखनात त्यांचा विशेष हातखंडा होता. त्यांचे काम जवळून माहीत झालेले आणि त्यांच्या कार्याने प्रेरित झालेल्या रत्नागिरीतील युवकांनी त्यांचे स्मृतिस्थान होण्याच्या दृष्टीने आणि त्यांची आठवण चिरंतन जपून ठेवण्यासाठी एक पतपेढी रत्नागिरीत सुरू करण्याचे ठरविले.
जनसामान्यांच्या विचारसरणीत त्यांच्याकडून बचत करण्याचे महत्व पटवून देऊन आणि लहानातल्या लहान घटकांपासून , विद्यार्थी , शेतकरी , व्यवसाय उत्सुक अशा सर्व घटकांना आर्थिक सहाय्य करता यावे, अशा दुहेरी हेतूने उद्दिष्ट ठेवून प्रा. नाना शिंदे, श्री. सतीश शेवडे, ऍड.श्री. अविनाश शेट्ये,श्री. बेहेरे, श्री. प्रसन्न दामले, श्री. प्रसाद गवाणकर अशा विविध स्तरातील व्यक्ती एकत्र येऊन पतपेढीची स्थापना केली. या पतपेढीच्या निर्मितीसाठी स्व. ऍड.अरुअप्पा जोशी, माजी आमदार सुरेंद्रनाथ तथा बाळ माने, अशा अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन लाभले. अखेर रत्नागिरीतील मध्यवर्ती ठिकाणी भाडेतत्वावरील कार्यालयात सुरू झालेली पतपेढी नंतर वर्षभरातच कार्यालयासाठी स्वतःची जागा खरेदी करून स्वयंपूर्ण झाली.
पहाता पहाता नागरिकांचा विश्वास संपादन झाल्याने सभासद संख्या व साधारण लाभार्थी वाढत गेले. विस्ताराची गरज वाटल्याने आणि अनुभवाने वाढता व्याप उचलू शकू, या विश्वासाने पहिली शाखा सुरू करण्यात आली. त्यामुळे तेथील स्थानिकांची उत्तम सोय होऊन पतपेढीलाही आपले कार्य विस्तारता आले. याचा अनुभव सकारात्मक आणि आव्हानात्मक राहिल्याने पतपेढीच्या संचालक मंडळाने पुढील शाखा खेडशी येथे सुरू केली. तेथेही वाढत्या रत्नागिरीच्या या भागात प्रतिसाद चांगला मिळत आहे. ठेवीदार आणि लाभार्थी यांचा विश्वास हाच पतपेढी सांभाळणाऱ्या सर्वांचे भांडवल असल्याने आता आणखी एक शाखा सुरू करण्याची तयारी सर्व संचालकांनी केली आहे. स्थानिक नागरिकांना त्यांच्या गावापर्यंत विविध योजना समजावून देऊन बचत व गरजू लोकांना कर्जपुरवठा ही महत्त्वाची उद्दिष्टे साध्य होत आहेत.
पतपेढीचा विस्तारित कारभार पहाता आत्तापर्यंत विविध गावातील बेरोजगारांना नोकरीची संधी पतपेढी देऊ शकली आहे, याचाच अर्थ पतपेढी रोजगार निर्मिती करण्यात यशस्वी झाली आहे.
या सर्व जनसामान्यांचा विश्वास आणि शहरानजीकच्या गावाची गरज पाहून दि. १ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजता वाटद खंडाळा या ठिकाणी कुसुमताई सहकारी पतपेढीच्या नूतन शाखेचा उद्घाटन कार्यक्रम होणार आहे. यावेळी मान्यवर आणि जनतेने उपस्थित राहून आपल्या मौलिक शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन संस्थेने केले आहे.