(मुंबई)
गोरेगावमधील घटना मुंबईतील गोरेगाव पूर्व येथील एका शाळेच्या जलतरण तलावात बुडून १४ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून विद्यार्थी पाण्यात उतरल्यानंतर त्या ठिकाणी सुरक्षेसाठी जीवरक्षक उपस्थित होता की नाही, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. या घटनेमुळे जलतरण तलावामधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
शार्दुल आरोलकर (वय १४) असं मृत मुलाचं नाव आहे. तो बोरिवली पश्चिम येथील योगी नगरमधील शासकीय वसाहतीत कुटुंबियांसोबत राहत होता. दिडोशी येथील शाळेत तो शिकत होता. गोरेगाव पूर्व येथील जनरल ए.के. वैध मार्गावरील यशोधन शाळेतील स्विमिंग पूलमध्येही घटना घडली. शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास शार्दुल स्विमिंग पुलमध्ये पोहण्यासाठी उतरला होता. मुलाला पाण्यात बुडताना पाहताच शाळेतील कर्मचाऱ्यांनी त्याला स्विमिंग पूलच्या बाहेर काढलं व तात्काळ त्याला जवळच्या शताब्दी रुग्णालयात हलवण्यात आलं. तेथील डॉक्टरांनी तपासून या विद्यार्थ्याला मृत घोषित केलं.
गेल्या सहा महिन्यांपासून तो शाळेतील तरण तलावात पोहण्यास शिकत होता. त्याचे प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण झाले होते. या तरण तलावात चार प्रशिक्षक होते. त्यातील मुख्य प्रशिक्षक सागर शार्दुलला पोहण्याचे प्रशिक्षण देत होते. शार्दुलचे वडील संजय आरोलकर यांनी याप्रकरणी दिंडोशी पोलिसांकडे तक्रार केली असून शाळा प्रशासन व प्रशिक्षकाविरोधात कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.