(मुंबई)
मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने गेल्या ४ दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करणा-या ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांच्या अभिनयाचे हजारो चाहते आहेत. आशा काळे यांनी ८० च्या दशकात मराठी चित्रपटांत आपल्या अभियनाने मराठी प्रेक्षकांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली होती. चित्रपट सृष्टीतील महत्त्वपूर्ण योगदानामुळे त्यांना यंदा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
बालगंधर्व रंगमंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त हा पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात येणार आहे. बालगंधर्व रंगमंदिर हे सर्व कलाकारांचे श्रद्धास्थान तसेच रसिकांचे आदराचे स्थान आहे. दरवर्षी या वास्तूचा वर्धापन दिन साजरा करण्यात येतो. यंदा २६ जून रोजी हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त आणि उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यानंतर पुढील ३ दिवस २८ जूनपर्यत विविध कलात्मक कार्यक्रमांची मेजवानी प्रेक्षकांसाठी असणार आहे. याच कार्यक्रमात अभिनेत्री आशा काळे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
या दरम्यान प्रामुख्याने जादूचे प्रयोग, महाराष्ट्राची लोकधारा, चांडाळ चौकडीच्या करामती, प्रसिद्ध अभिनेते समीर चौगुले यांची मुलाखत, मनिषा लताड प्रस्तूत हिटस् ऑफ लता मंगेशकर व आर. डी. बर्मन संगीत रजनी, पारंपारिक भारूड या कार्यक्रमांचा समावेश असणार आहे. याशिवाय महिलांसाठी मंगळागौर, फक्त महिलांसाठी लावणी महोत्सव आदी कार्यक्रम, चर्चासत्र असणार आहे.