(मुंबई)
पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या दर्शना पवार हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी राहुल हांडोरे याला मुंबईतून अटक केली आहे. आरोपीला पुण्यात आणण्यात आलं असून त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर दर्शना पवार हिच्या आईने आणि भावाने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याने माझ्या बहिणीचा घात केला. आरोपीला आमच्या ताब्यात द्या अन्यथा मारून टाका, अशी संतप्त प्रतिक्रिया दर्शनाच्या भावाने व्यक्त केली आहे तर माझ्या मुलीचे जसे तुकडे केले तसे त्याचे करू द्या, माझ्या मुलीला मीच न्याय देऊ शकते, अशा शब्दांत तिच्या आईने संताप व्यक्त केला आहे.
दर्शनाच्या अशा प्रकारे निर्घृण हत्या झाल्याने पवार कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. लेकीने एमपीएससी परीक्षेत प्रचंड मेहनतीने पास केली होती. पवार कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण होते. सगळीकडे तिचे आणि कुटुंबियांचे अभिनंदन करण्यात येत होते. मात्र पुरस्कार स्विकारण्यासाठी आली आणि तिचा राहुलने घात केला. त्यांनी थेट राहुलला फाशी देण्याची मागणी सरकारकडे केली आहे.
माझी मुलगी गेली आहे तशा इतरांच्या मुली जाऊ नये. यासाठी राहुलला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. राहुलला शिक्षा देण्यासाठी मी समर्थ आहे त्याला आमच्या ताब्यात दिले पाहिजे. नाहीतर सरकारनेच त्याला फाशी दिली पाहिजे. तर दर्शना पवारचा भाऊ म्हणतो की, राहुलमुळे माझ्या बहिणीला खूप त्रास झाला आहे. त्याच्यामुळे आमची धडधाकट बहिण गेली. त्यामुळे तुम्ही त्याला मारा नाहीतर आमच्याकडे सोपवा, अशी माझी सरकारला विनंती आहे