(पुणे)
मेजर असल्याचे सांगत लष्करी गणवेश घालून फिरणार्या कर्नाटकातील तोतया मेजरला पोलीसांनी पुण्यातील चिखली येथून अटक केली आहे. ही कारवाई लष्कराचे गुप्तचर विभाग आणि पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेतील खंडणी विरोधी पथक-२ ने कारवाई केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तो महिलांना देखील लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करायचा.
प्रशांत भाऊराव पाटील (वय ३२, रा. सोनवणे वस्ती, चिखली, मुळ रा. कुपटगिरी, ता. खानापूर, जि. बेळगाव) असे अटक करण्यात आलेल्या तोयता मेजरचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत सदर्न कमांड येथे कार्यरत असल्याचे भासवत होता. त्याने लष्कराचा गणवेश घालून फोटो काढले होते. तसेच त्याचे बनावट आय डी वापरुन सदर्न कमांड येथील मुख्यालयाच्या परिसरात तो अधिकारी असल्याचे दाखवत होता. सदर्न कमांड येथे रहात नसतानाही या कार्यालयाचा वापर करुन बनावट आधार कार्ड तसेच पॅन कार्ड व ओळखपत्र तयार करुन फसवणूक करीत असल्याचे आढळून आले.
दरम्यान, तो विवाह विषयक वेबसाईट्स वर महिलांना लष्करात मेजर असल्याचे भासवून इम्प्रेस करून फसवायचा. पाटील याच्यावर यापूर्वीही महिलांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्यावर अत्याचार केलेल्याचा गुन्हा दाखल आहे. त्याच्याकडून आय फोनसह दोन मोबाईल, भारतीय सैन्य दलाचे दोन गणवेश, इतर साहित्य, तीन आधार कार्ड, पॅन कार्ड, ओळखपत्र, गणवेश असलेले चार कलर फोटो असे साहित्य जप्त केले आहेत.
याबाबत माहिती मिळताच प्रशांतला अटक करण्यासाठी लष्कराच्या गुप्तचर विभागाला आदेश देण्यात आले होते. त्यानुसार पोलीसांनी चिखली येथून त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे सदर्न कंमाडच्या पत्त्यावर आधार कार्ड, पॅन कार्ड मिळाले आहे. तसेच त्याच्यावर यापुर्वी महिलांना लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे दोन गुन्हे दाखल आहेत. प्रशांतला अटक केल्यानंतर त्याच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.