(रत्नागिरी)
गृह विभागाने राज्यातील ४४९ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या केल्या असून, यामध्ये जिल्ह्याला पाच नवे निरीक्षक मिळाले आहेत. राज्य सरकारने यावर्षी बदल्या करताना साईट ब्रॅंचमध्ये कार्यरत असलेल्या अनेक पोलिस निरीक्षकांना जिल्हा, महानगरात, शहरात नियुक्त केले आहे. पोलिस प्रशिक्षण केंद्र, राज्य गुप्तवार्ता विभाग येथे ठाण मांडून बसलेल्या पोलिस निरीक्षकांना आता पोलिस ठाण्यात काम करावे लागणार आहे.
पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्याला पाच नवीन पोलिस निरीक्षक मिळाले आहेत. त्यामध्ये रत्नागिरीत सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून उत्तम काम केलेले राजेंद्र यादव यांची पोलिस निरीक्षक म्हणून रत्नागिरी जिल्ह्यात बढतीने बदली झाली आहे. ते सध्या लोहमार्ग मुंबई येथे कार्यरत आहेत. ठाणे शहर येथून वैभव धुमाळ, पोलिस प्रशिक्षण केंद्र सोलापूर येथून स्मिता सुतार, मुंबई शहर येथून महेश तोरसकर, ठाणे शहरातून सचिन सावंत यांची नियुक्ती जिल्ह्यात करण्यात आली आहे. गृह विभागाच्या दोन्ही यादीत रत्नागिरीतील एकाही पोलिस निरीक्षकाची जिल्ह्याबाहेर बदली करण्यात आलेली नाही.
नव्याने बदली झालेले पोलिस निरीक्षक जिल्ह्यात रूजू झाल्यानंतर जिल्हांतर्गत पोलिस निरीक्षकांच्या बदल्या कोकण परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक यांच्या मान्यतेने होणार आहेत. त्यामुळे नव्या नियुक्त्यांमध्ये रत्नागिरी शहर, चिपळूण शहर, खेड शहर येथे कोणाची वर्णी लागते याकडे पोलिस दलाचे लक्ष लागले आहे.