(मुंबई)
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाने 19 जून रोजी मुंबईत दोन वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करून शिवसेनेचा स्थापना दिवस साजरा करण्याची तयारी केली आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही आजचा शिवसेनेचा स्थापना दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्याच्या तयारीत आहेत. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना नेस्को मैदानावर कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे, जे गोरेगाव येथे आहे. बंडखोरीनंतर पहिल्यांदाच पक्षाचा वर्धापन दिन साजरा केला जातोय. संध्याकाळी 7 वाजल्यापासून या कार्यक्रमाला सुरूवात होईल. दीड तास सत्य परिस्थितीवर नाट्यांतर असेल, त्यानंतर प्रमुख नेत्यांची भाषणं होतील. या कार्यक्रमासाठी प्रत्येक आमदाराला साधारण 300 कार्यकर्ते घेऊन येण्यास सांगितलं असल्याची माहिती आहे. रात्री 8 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं भाषण होईल.
तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा 57 वा वर्धापन दिन आज षण्मुखानंद सभागृहात संध्याकाळी 6:30 वाजता पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातील पक्षाचे पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत. वर्धापन दिन सोहळ्याला उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा मनोरंजनात्मक कार्यक्रम देखील सादर होणार आहे.
गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी उद्धव ठाकरेंशी फारकत घेतली होती. त्यानंतर आपली शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा दावा त्यांनी केला होता. नंतर दोघेही निवडणूक आयोगाकडे गेले. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाच खरी ठरवून धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हही दिले. तर ठाकरे गटाचे नाव शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) निश्चित करून त्यांना मशाल हे निवडणूक चिन्ह म्हणून देण्यात आले. याआधी दसरा मेळावाही दोन्ही पक्षांनी स्वतंत्र साजरा केला होता, आता शिवसेनेचा स्थापना दिवसही दोन ठिकाणी साजरा होणार आहे.
शिवसेनेच्या 57 वर्षाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडतंय. एकनाथ शिंदे यांना शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे मिळाल्यानंतरही ठाकरे गटाकडून आम्हीच मूळ शिवसेना असल्याचा दावा केला जातो. त्यामुळे दोन्ही गटांकडून आज शिवसेनेचे दोन वेगळे वर्धापन दिन साजरे होणार आहेत. दोन्ही गटाकडून जोरदार तयारी सुरू आहे. दसरा मेळाव्यानंतर पुन्हा एकदा मुंबईत असा प्रसंग निर्माण होणार आहे.