(मुंबई)
मुंबईत धावत्या लोकल ट्रेनमध्ये तरुणीवर बळजबरी करणारा आरोपी नवाझु करीम शेख यांच्या गुन्हेगारी कृत्यांबाबत आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. ट्रेनमध्ये बळजबरीचा प्रयत्न करण्याआधी आरोपीनं पाच महिलांचा विनयभंग केल्याचं समोर आलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातून बुधवारी सकाळी साडे सात वाजता बेलापूरच्या दिशेनं निघालेल्या ट्रेनमध्ये हा आरोपी घुसला होता. त्यानं महिलांच्या डब्यात एकट्या असलेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला आणि मशिद बंदर स्टेशनला उतरून तो पळून गेला. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे त्याचा माग काढला आणि आठ तासांत त्याला बेड्या ठोकल्या.
सीसीटीव्ही फूटेजच्या पाहणीतून त्याची इतरही कृत्ये समोर आली आहेत. सीएसएमटी स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर त्यानं पाच महिलांशी गैरवर्तन केल्याचं सीसीटीव्हीत दिसत आहे. लाल टी-शर्ट घातलेला हा आरोपी महिलांना हाताच्या कोपरानं ढकलताना, जाणीवपूर्वक धक्काबुक्की करताना, काही महिलांना चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करताना दिसतोय. तर दुसऱ्या एका क्लिपमध्ये हाच विकृत आरोपी एका महिलेचा रस्ता अडवताना दिसतोय. मात्र, महिला त्याच्याशी हुज्जत घालण्याऐवजी निघून जाताना दिसतेय. वरील पैकी एकाही पीडित महिलेनं अद्याप तक्रार केली नसल्याचं पोलिसांनी सांगितले आहे.
सीएसएमटी पोलिसांनी नवाझु शेखवर भादंविच्या कलम ३७६ अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. त्याची अधिक चौकशी सुरू असून रेल्वे पोलिसांची पथकं रेल्वे स्टेशनवरील वेगवेगळी फुटेजेस बारकाईनं तपासत आहेत.