(नवी दिल्ली)
दिल्लीतील मुखर्जी नगरमधील कोचिंग सेंटर इमारतीला गुरुवारी आग लागली होती. या घटनेची दिल्ली उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आहे. न्यायालयाने दिल्लीच्या अग्निशमन सेवा, दिल्ली पोलीस आणि एमसीडी यांना नोटीस बजावली आहे. तसेच दोन आठवड्यामध्ये या नोटिशीला उत्तर द्यावे असे आदेश दिले आहे. न्यायालयाने दिल्ली अग्निशमन दलाला अग्निसुरक्षा ऑडिट करण्याचे तसेच अग्निसुरक्षा प्रमाणपत्रे जारी केली आहेत की नाही, हे तपासण्याचे निर्देश दिले आहेत.
दिल्ली विद्यापीठाच्या जवळ असलेल्या ज्ञाना इमारतीत गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास आग लागली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. या इमारतीत कोचिंग सेंटर्सची संख्या जास्त आहे. आग लागल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. विद्यार्थी सैरावैरा पळू लागले. अनेक जणांनी जीव वाचवण्यासाठी खिडकीतून उड्या टाकल्या होत्या. या आगीत जखमी झालेल्या मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यामधील सुमारे ५० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्हा गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली आहे. सध्या या प्रकरणाची दिल्ली पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.