बिपरजॉय चक्रीवादळ गुजरात समुद्रकिनाऱ्यावर अंतरावर घोंगावत आहे. या पार्श्वभूमीवर वादळाच्या नावानेच एका मुलीचा जन्म झाला आहे. गुजरातमधील एका महिलेने आपल्या एक महिन्याच्या मुलीचे नाव चक्क ‘बिपरजॉय’ ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या नावाचे चक्रीवादळ कच्छच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. हे कुटूंब बिपरजॉय वादळामुळे विस्थापित झाले असून चक्रीवादळाच्या भीतीने त्यांनी आपले घर सोडले आहे. सध्या मुलीचे कुटूंब कच्छ जिल्ह्यातील जखाऊ मधील एकाशेल्टर होममध्ये राहिले आहे. यापूर्वीही चक्रीवादळावरून नाव ठेवण्याचे असे प्रकार घडले आहेत. यापूर्वी तितली, फानी आणि गुलाब चक्रीवादळांवरून मुलांची नावे ठेवण्यात आली आहेत. यावेळी या चक्रीवादळाचे नाव बांग्लादेशने ठेवले असून त्याला जागतिक हवामान संघटनेने स्वीकार केले आहे.
भारतात यापूर्वीही नैसर्गिक आपत्तींच्या नावांवरून मुलांची नावे ठेवली गेली आहेत. यापूर्वी कोविड काळात उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील एका कुटूंबाने आपल्या मुलीचे नाव कोरोना ठेवले होते. त्याचबरोबर आंध्रप्रदेशमधील कडप्पा जिल्ह्यातील दोन मुलांची नावेही या व्हायरसच्या नावावरून ठेवण्यात आली होती. काही कुटूंबांनी म्हटले की, त्यांनी कोरोनावरून मुलांची नावे यासाठी ठेवली आहेत, कारण या महामारीने संपूर्ण जगाला एक केले आहे.
इतकेच नाही तर त्रिपुरामध्ये अडकलेल्या राजस्थानमधील एका कुटूंबाने आपल्या मुलाचे नाव लॉकडाऊन ठेवले होते. असेच प्रकरणयूपीमध्ये समोर आले होते. जेव्हा मुंबईहून यूपीकडे येत असलेल्या कुटूंबाने ट्रेनमध्ये जन्मलेल्या मुलाचे नाव लॉकडाउन ठेवले होते.
आतापर्यंत कच्छमधील ७० हजारहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. हवामान संघटनेने दिलेल्या माहितीनुसार अशा चक्रीवादळाचा परिणाम एक आठवडा किंवा अधिक काळापर्यंत राहू शकतो. बिपरजॉय चक्रीवादळही दोन ते तीन दिवस राहणार असल्याची शक्यता आहे.