(मुंबई)
एकनाथ शिंदे जनतेमध्ये सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचा तसेच राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या शिवसेनेच्या जाहिरातीवरून भाजप व शिंदे गटातील मतभेट चव्हाट्यावर आले आहेत. या जाहिरातीवरून राजकीय वातावरणं चांगलेच तापलं आहे. जाहिरातीमुळे भाजपा नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर कडाडून हल्ला केला, त्याला शिंदे गटाकडूनही पलटवार करण्यात आला. या जाहिरातीमुळे युतीतील नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे. अशातच भाजप नेत्याने शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना युतीची खुली ऑफर दिली आहे.
मोदी सरकारने नऊ वर्षाचा कार्यकाल पूर्ण केल्याबद्दल मोदी @९ महाजनसंपर्क अभियान देशात राबविले जात आहे. या अभियानाच्या निमित्ताने उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. मौर्य यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना मोर्य म्हणाले की, उद्धव ठाकरेंसाठी भाजपाची दारं सदैव उघडीच आहेत.
मोर्य म्हणाले की, उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र आहेत. त्यांच्या मनात काही विचार असतील, तर आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्याशी त्यांनी चर्चा करावी. भाजपाचे दरवाजे कधी बंद नसतात. भाजपाचे दरवाजे उघडेच असतात. पण, उद्धव ठाकरेंना चर्चा करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. भाजप त्यांच्यासमोर चर्चेचा प्रस्ताव ठेवणार नाही. कारण भाजपाने चूक केलेली नाही. त्यामुळे चर्चेसाठी उद्धव यांनीच पुढे आलं पाहिजे.