(मुंबई)
‘हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट”आणि ‘तितली उडी” फेम प्रसिद्ध गायिका शारदा राजन अय्यंगार यांचे कर्करोग आजाराने नुकतेच निधन झाले. त्या ८६ वर्षांच्या होत्या. शारदा या पॉप अल्बम लाँच झालेल्या पहिल्या भारतीय महिला गायिका होत्या.
शारदा यांचा जन्म २५ ऑक्टोबर १९३७ रोजी तामिळनाडूतील एका ब्राह्मण कुटुंबात झाला. शारदा यांना १९७० मध्ये आलेल्या ‘जहां प्यार मिले’ या चित्रपटात ‘बात जरा है आप की’ हा कॅबरे गाण्यासाठी महिला पार्श्वगायिकेचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. १९६६ मध्ये आलेल्या ‘सूरज’ चित्रपटातील ‘तितली उडी उड जो चली फूल ने कहा आजा मेरे पास तितली काहे में चली आकाश’ हे गाणे त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात हिट गाणे होते. शारदा यांनी शंकर जयकिशन यांच्यासोबत दीर्घकाळ काम केले आणि अनेक हिट गाणी दिली. त्यांनी मोहम्मद रफी, आशा भोसले, किशोर कुमार, येशुदास, मुकेश आणि सुमन कल्याणपूर यांसारख्या दिग्गजांसोबत काम केले. शारदा यांनी वैजयंतीमाला, सायरा बानो, हेमा मालिनी, शर्मिला टागोर, मुमताज, रेखा आणि हेलन यांसारख्या आघाडीच्या अभिनेत्रींना आपला आवाज दिला आहे.
१९७१ मध्ये लाँच झालेल्या त्यांच्या अल्बमचे नाव ‘सिझलर्स “असे होते. शारदाने बॉलिवूडशिवाय तेलुगू, मराठी, इंग्रजी आणि गुजराती भाषांमध्येही गाणी गायली आहेत. २००७ मध्ये त्यांचा गझल अल्बम ‘अंदाज-ए-बयान’ – ही प्रसिद्ध झाला आहे, जो मिर्झा गालिबच्या लोकप्रिय गझलांवर आधारित होता.