(मुंबई)
हार्बर रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मशीद रेल्वेस्थानक दरम्यान धावत्या लोकलमध्ये २० वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली. सकाळी साडेसातच्या सुमारास २० वर्षीय तरुणी सीएसएमटी स्थानकावरून पनवेलला जाणाऱ्या लोकलच्या द्वितीय श्रेणीच्या डब्यात एकटीच बसली होती. सीएसएमटी स्थानकातून ही लोकल ट्रेन सुटल्यानंतर गाडी वेग पकडत असतानाच नवाझ करीम नावाचा ४० वर्षीय इसम महिलांच्या डब्यात चढला. डब्यात एकटी तरुणी पाहत नवाझ करीमने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.
यादरम्यान संबंधित तरुणीने नवाझ करीमचा जोरदार प्रतिकार केला. ही झटापट सुरु असतानाच मशीद बंदर रेल्वेस्थानक आले आणि ही तरुणी लोकल ट्रेनमधून खाली उतरली. तरुणीने घडलेला प्रकार रेल्वे पोलिसांना सांगितला. त्यानंतर महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी तिला पुन्हा सीएसएमटी येथे आणले, याठिकाणी तिची तक्रार नोंदवून घेण्यात आली. ही तरुणी बेलापूर येथे परीक्षा देण्यासाठी चालली होती. या प्रसंगानंतर पोलिसांनी अवघ्या आठ तासांमध्ये आरोपीला अटक केली. त्याच्यावर बलात्काराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खासदार सुप्रिया सुळे म्हणतात…
धावत्या लोकलमध्ये महिलांच्या डब्यात चढून एका व्यक्तीनं तरुणीवर बलात्कार केल्याची घटना अतिशय संतापजनक आहे. यामुळं पुन्हा एकदा मुंबई लोकलच्या सुरक्षेचा प्रश्न पुढं आला आहे. महाराष्ट्रात गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेली नसून याला गृहखात्याची निष्क्रियता कारणीभूत आहे. या घृणास्पद घटनेतील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी तपासयंत्रणांनी कार्यवाही करणं गरजेचं आहे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.