( देवरुख )
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शासनकाळ हा संपूर्ण भारताच्या दृष्टीने सुवर्णकाळ असल्याचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या विश्लेषकांनी अनेकवेळा नमूद केले आहे. देशाची अर्थव्यवस्था, आरोग्य व्यवस्था, संरक्षण व्यवस्था यांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याचे श्रेय मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार प्रभावीपणे करत आहे. मोदी यांच्या पंतप्रधान म्हणून पहिल्यांदा शपथ घेऊन आता ९ वर्षे पूर्ण झाली आहेत. या मतदारसंघात असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था लोकांनी मोठ्या विश्वासाने भाजपाच्या ताब्यात दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ‘मोदी@९’ अभियानांतर्गत संगमेश्वर तालुका भाजपा कार्यालय देवरुख येथे संयुक्त मोर्चा बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचे ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अभिजित शेट्ये यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून रत्नागिरी (द.) जिल्हा संघटन सरचिटणीस श्री. राजेश सावंत यांनी मार्गदर्शन केले. तर चिपळूण-संगमेश्वर विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. प्रमोद अधटराव यांनी आजपर्यंतच्या कामकाजाचा आढावा घेतला. केंद्र सरकारच्या सर्व कल्याणकारी योजना सर्वसामान्य लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे नियोजन या बैठकीत करण्यात आले. सोशल मिडीया, युवा, महिला, कामगार, ओबीसी, वाहतूक, शेतकरी, उद्योग आदी मोर्चांचे तालुका संयोजक, जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते. सदर बैठकीसाठी ओबीसी जिल्हा अध्यक्ष श्री.अभिजित शेट्ये तसेच महिला मोर्चा तालुकाध्यक्षा सौ. कोमल रहाटे यांनी मेहनत घेतली व बैठक यशस्वी केली.