(नवी दिल्ली)
एकदिवसीय विश्वचषक यंदाच्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात खेळवला जाणार आहे. भारतीय क्रिकेट संघ आपला पहिला सामना ८ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. भारत-पाकिस्तान सामना १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, लवकरच विश्वचषकाबाबत आयसीसीकडून वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.
यावेळी विश्वचषक स्पर्धेत एकूण १० संघांमध्ये ४८ सामने होणार आहेत. टीम इंडिया, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका या मेगा स्पर्धेसाठी आधीच पात्र ठरले आहेत. उर्वरित दोन संघ या महिन्यात झिम्बाब्वे येथे सुरू होणाऱ्या पात्रता स्पर्धेद्वारे निश्चित केले जातील. पात्रता स्पधांमध्ये वेस्ट इंडिज, श्रीलंका, नेदरलँड, आयर्लंड, नेपाळ, ओमान, स्कॉटलंड, संयुक्त अरब अमिराती आणि झिम्बाब्वे यांचा समावेश आहे.
अंतिम सामना १९ नोव्हेंबरला…
२०१९ च्या एकदिवसीय विश्वचषकाप्रमाणे यावेळीदेखील सामने राऊंड – रॉबिन स्वरूपात खेळले जातील, जिथे प्रत्येक संघ दुसऱ्याविरुद्ध एकदा खेळेल. म्हणजेच, ग्रुप स्टेज संपल्यानंतर सर्व संघ ९ – ९ सामने खेळतील. त्यानंतर ग्रुपमधील अव्वल ४ संघ उपांत्य फेरीत आमने-सामने येतील. उपांत्य फेरीचे सामने १५ आणि १६ नोव्हेंबरला खेळवले जाण्याची शक्यता आहे. अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे होणार आहे, ज्यात स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्याचे आयोजन केले जाईल.