(मुंबई)
शिंदे – फडणवीस सरकारच्या दुसन्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असतानाच शिंदे गटातील ६ मंत्र्यांना डच्चू मिळण्याच्या शक्यतेने शिंदे गटात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच भाजपचे शीर्षस्थ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली होती. या भेटीत मंत्रिमंडळ विस्तारातील नव्या नावांवर चर्चा होण्याऐवजी शिंदे गटातील ६ अकार्यक्षम आणि वादग्रस्त मंत्र्यांना डच्चू देण्याची सूचना अमित शहांनी केल्याचे सूत्रांकडून समजते.
अमित शहा यांनी या ६ मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र आक्षेप घेतले आहेत. या मंत्र्यांच्या कामाच्या पद्धतीविषयी भाजपच्या नेत्यांकडून शहा यांच्यापर्यंत अनेक तक्रारी पोहचल्या आहेत. त्यामुळे शहा यांनी या मंत्र्यांसंदर्भात निर्णय घेण्याची सूचना शिंदे यांना केल्याचे समजते. परिणामी शिंदे गटात अस्वस्थता वाढली असून हे मंत्री अडचणीत आले आहेत. दरम्यान, आज मंत्रिमंडळ बैठक होणार असून याकडे लक्ष लागले आहे. पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड आणि कृषिमंत्री अब्दुल सत्तार आणि सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत या ६ मंत्र्यांच्या कार्यपद्धतीबद्दल खुद्द भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी आहेत. या मंत्र्यांची कार्यपद्धती सरकारची प्रतिमा मलीन करणारी आहे. त्यामुळे या मंत्र्यांना चाप लावण्याची मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी दिल्लीकडे केली आहे. या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी गेल्या आठवड्यात दिल्ली भेटीत एकनाथ शिंदे यांना काही सूचना केल्याचे सांगण्यात येते. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी याबाबत खुलासा करताना शिंदे गटाच्या काही मंत्र्यांना डच्चू देण्याचा सल्ला शहा यांनी दिल्याचे म्हटले होते.
सूत्रांच्या माहितीनुसार भाजपच्या दृष्टीने मंत्री गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे, शंभूराज देसाई, संजय राठोड आणि अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत यांची कामगिरी समाधानकारक नाही. गुलाबराव पाटील यांच्या सैल बोलण्याचा फटका भाजपला बसू शकतो, तर रोजगार हमी योजनेच्या सचिवपदावरून अलीकडेच निवृत्त झालेल्या एका अधिकाऱ्याला विभागात पुन्हा काम करता यावे म्हणून त्याच्यासाठी समन्वयक पद निर्माण करून त्याचे पुनर्वसन व्हावे म्हणून विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला भाजपच्या मंत्र्यांचा आक्षेप आहे. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या कार्यपद्धतीवर खुद्द खात्यातील अधिकाऱ्यांकडून तक्रारी आहेत. त्यांनी अलीकडेच काही अधिकाऱ्यांच्या विशेष बदल्या केल्या. या विशेष बदल्यांमध्ये अर्थकारण झाल्याची चर्चा आहे. याशिवाय विभागातील अनेक नस्तींवर सुनावणी घेऊन त्या नस्ती महिनोन्महिने निर्णयासाठी प्रलंबित ठेवण्याचा नवा फंडा देसाई यांनी सुरू केल्याची तक्रार आहे.
संजय राठोड हे आघाडीच्या सरकारमध्ये वनमंत्री असताना वादग्रस्त ठरले होते. एका तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता शिंदे सरकारमध्येही राठोड वादग्रस्त ठरू लागले आहेत. मध्यंतरी औषध विक्रेत्या संघटनांनी राठोड यांचे कार्यालय भ्रष्टाचाराचा अड्डा झाल्याचा आरोप केला होता. हा आरोप करताना संघटनेने राठोड यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांची नावे घेतली होती. अब्दुल सत्तार हे सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरले आहेत. गेल्या वर्षी नागपूर अधिवेशनात विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्तार यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप केला होता. आता कृषी खात्यातील त्यांच्या कामाबद्दलही अनेक तक्रारी आहेत. अमित शहा यांनी या मंत्र्यांच्या तक्रारींबद्दल एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली आहे. त्यामुळे आता यावर शिंदे यांना निर्णय घ्यावा लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मंत्रिमंडळ विस्तार लांबला, शिंदेंनी घेतली तातडीची बैठक
शिंदे गटातील ६ मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्याच्या सूचनेसोबतच आगामी मंत्रिमंडळ विस्तारात सामील होण्यास इच्छुक काही नेत्यांच्या नावांवरही केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी काट मारल्याने मंत्रिमंडळ विस्तार लांबल्याचे समजते. त्यामुळे शिंदे गटात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. हे सर्व नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खास मर्जीतील आहेत. त्यामुळे या नेत्यांना नेमके कसे समजवायचे या पेचात मुख्यमंत्री शिंदे अडकले आहेत. अखेर ४ दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावरून मुंबईत परतल्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी सोमवारी रात्री शिवसेनेचे सर्व मंत्री, आमदार, खासदार, प्रवक्ते आणि पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक वरळीतील एनएससीआय सेंटरमध्ये बोलावली होती. या बैठकीत आपल्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन भाजपच्या वाढत्या दबावावर घालण्यासाठी रणनीती आखल्याचे समजते.