(पुणे)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला २० जूनला एक वर्ष पूर्ण होत आहे. तर १९ जून रोजी शिवसेनेचे दोन गटाचे दोन मेळावे पार पडणार आहेत. एक शिंदे गटाचा तर दुसरा ठाकरे गटाचा. शिवसेनेत फूट पडल्यापासून दोन्ही गट एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातच आता राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे.
राज्यातील गद्दार सरकारची वर्षपूर्ती येत आहे. त्यामुळे जर तुम्हाला कोणी २० तारखेला गुवाहाटीला जाण्याचं तिकीट दिलं, तर सांभाळून राहा,अशी मिश्किल टीका राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्यांनी शिंदे गटातील आमदारांच्या मतदारसंघातील लोकांना सावध राहण्याचा सल्ला देखील दिला आहे. सांभाळून राहा, २० जूनला कुणाला रॅडिसन हॉटेलचं तिकिट दिलं तर जाऊ नका, असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलं आहे. खासदार सुप्रिया सुळे या इंदापूर तालुक्यातील न्हावी गावात नागरिकांशी संवाद साधत होत्या त्यावेळी सुप्रिया सुळेंनी सरकारला टोला हाणला आहे.
.सुप्रिया सुळे म्हणाल्या की, तुम्ही सगळे सांभाळून राहा. २० तारखेला कुणाला गुवाहाटीच्या रॅडिसन हॉटेलचं तिकिट दिलं तर जाऊ नका. गद्दारी करायला प्रायव्हेट प्लेन लागलं, फाईव्ह स्टार हॉटेल लागलं. मात्र गद्दारी करताना एकालाही असं वाटलं नाही की, आपल्या मतदारसंघात जाऊन गावातल्या लोकांबरोबर बैठक बोलावून त्यांना आपला निर्णय सांगावा तसेच त्यांच्याकडे समर्थन मागावे. तुम्ही पक्ष बदलला, सरकार पाडलं, विचारधारा बदलली पण एकालाही वाटू नये? की आपल्या मतदारसंघात जावं. लोकांना विश्वासात घ्यावं.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, हे सर्वजण गुवाहाटीत जाऊन मजा करत होते. कुणी शॉर्ट्स घातले होते, कुणी एकमेकांना मिठ्या मारत होते. हे सुट्टीला गेले होते की देशाच्या सेवेसाठी ? नुकतीच मी एक बातमी वाचली की भाजपाने शिंदे सरकारला सांगितलं आहे की, पाच मंत्री घालवा. मी विचार करत आहे की राष्ट्रवादी काँग्रेसे सरकार सत्तेत असताना काँग्रेसने कधी सांगितले नाही की, तुमचे कोण मंत्री करा किंवा तुमच्या काही मंत्र्यांना घालवा, दोन्ही पक्ष आपआपले मंत्री करत असताअसे बोलत त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.