(मुंबई)
कल्याण लोकसभा मतदार संघातील भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील वाद काही कमी नाव घेत नाही. भाजपचे कल्याणमधील पदाधिकारी नंदू जोशी यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपच्यावतीने रविवारी डोंबिवलीत पत्रकार परिषद घेण्यात आली. यामध्ये जोशी यांच्यावर पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत भाजपने मानपाडाचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांच्या बदलीची मागणी केली आहे.
बागडे यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता असल्याचा आरोप भाजपाने यावेळी केला आहे. इतकी संपत्ती एका वरिष्ठ पोलिस निरिक्षकाकडे कोठून आली? असा सवाल त्यांनी केला आहे. ही मालमत्ता त्यांनी कशी जमवली यासाठी ईडी, सीबीआय संबंधित खात्याकडे चौकशीची मागणी करणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्याविषयीची कागदपत्र देखील सादर करणार असल्याचे प्रदेश सचिव गुलाबराव करुंजुले यांनी सांगितले. बागडे यांची बदली न होता त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याने भाजपचा रोष वाढला आहे.
राजकीय वरदहस्तामुळे भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्याचा आरोप करत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बागडे यांच्या बदलीची मागणी केली. त्यांची बदली होत नसल्याने कल्याण येथे भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आक्रमक होत सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत एक बैठक घेतली. बागडे यांची बदली होत नाही तोपर्यंत शिवसेनेच्या सर्व कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याचे तसेच शिंदे गटास सहकार्य न करण्याचा ठराव मांडला गेला. यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे कमालीचे नाराज झाले असून त्यांनी भाजप शिवसेना युतीसाठी खासदार पदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखविली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्पष्टीकरणानंतर हा वाद शमेल असे वाटत असतानाच ठाणे येथे पार पडलेल्या भाजपच्या मेळाव्यात आमदार संजय केळकर यांनी ठाणे व कल्याण लोकसभा मतदार संघ हे आपले होते, यापुढेही राहतील असे म्हणत स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते, पदाधिकारी यांची भावना बोलून दाखवली. यामुळे आता हा वाद शिवसेना – भाजपा युतीत कळीचा मुद्दा ठरला आहे.