(पुणे)
कॉन्ट्रॅक्टरकडून 17 हजाराची लाच घेताना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सहाय्यक उद्यान निरीक्षकास आणि उपलेखापाल यांना अॅन्टी करप्शनच्या पथकाने लाच घेताना रंगेहाथ पकडले आहेत. त्यांच्याविरूध्द भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटककरण्यात आली आहे.
सहाय्यक उद्यान निरीक्षक किरण अर्जुन मांजरे (46) आणि उपलेखापाल संजय देवराम काळभोर (वय-56) असे लाच घेणार्याची नावे आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे कॉन्ट्रॅक्टर असून त्यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या उद्यानामध्ये केलेल्या देखभालीच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी मांजरे यांच्याकडे विनंती केली होती. किरण मांजरे यांनी त्यासाठी तक्रारदाराने 17 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली होती. प्राप्त तक्रारीची पडताळणी केली असता किरण मांजरे यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तसेच उपलेखापाल संजय काळभोर यांनी देखील लाचेची मागणी करुन मांजरे यांनी केलेली लाचेची रक्कम देण्यास मदत केली. सापळा रचल्यानंतर सरकारी पंचासमक्ष सहाय्यक उद्यान निरीक्षक किरण मांजरे यांनी तक्रारदाराकडून 17 हजार रूपये घेतले. त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.