(लांजा)
काजळी नदीवर अंघोळ करण्यासाठी गेलेल्या कोकण रेल्वेच्या ४७ वर्षीय मजुराचा शिरंबवली येथे नदीच्या डोहात बुडून मृत्यू झाला. या घटने प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल भाऊराव पवार (वय ४७, राहणार चिंदवाडा मध्य प्रदेश) हा कोकण रेल्वेमध्ये मजूर म्हणून काम करत होता. शिरंबवली येथील रेल्वे ट्रॅक शेजारीच तो राहत होता. मंगळवारी ६ जून रोजी सायंकाळी ७ वाजता अनिल पवार हा मजूर शिरंबवली येथील काजळी नदीवर आंघोळीसाठी गेला होता. मात्र तो परत न आल्याने त्याच्या समवेत असलेल्या अन्य मजुरांनी त्याचा शोध घेतला. मात्र त्याचा कुठेही पत्ता लागला नव्हता. त्यानंतर बुधवारी ७ जून रोजी सकाळी पुन्हा या सहकारी कामगारांनी बेपत्ता झालेल्या अनिल पवार याचा शोध घेतला. यावेळी तो नदीच्या डोहामध्ये मृत अवस्थेत आढळून आला.
याबाबतची माहिती लांजा पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर लांजा पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आणि पंचनामा व लांजा ग्रामीण रुग्णालयात शिवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला. यानंतर अनिल पवार याचा मृतदेह मध्यप्रदेश येथे त्याच्या गावी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास राजेंद्र कांबळे हे करत आहेत.