(नवी दिल्ली)
भारताने आणखी एक यशस्वी भरारी घेतली आहे. भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डीआरडीओने अग्नि प्राइम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. या क्षेपणास्त्राला अग्नि-पी असेही म्हटले जाते. डीआरडीओकडून अग्नि प्राइम या न्यू जनरेशन बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली. या क्षेपणास्त्रामध्ये एकाच हल्ल्यात शत्रूचे अनेक अड्डे उद्ध्वस्त करण्याची क्षमता आहे. विशेष म्हणजे तब्बल २ हजार कि. मी.चे लक्ष्य भेदण्याची क्षमताही या क्षेपणास्त्रात असल्याचे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
ओडिशाच्या किना-यावरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून अग्नि प्राइम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने निवेदनाद्वारे दिली. प्रणालीची अचूकता आणि विश्वासार्हता तपासण्यासाठी अग्नि प्राइम क्षेपणास्त्राच्या तीन यशस्वी विकासात्मक चाचण्यांनंतर वापरकर्त्यांनी प्री-इंडक्शन नाईट लाँच केले. बुधवारी रात्री अब्दुल कलाम बेटावरील लॉन्चिंग कॉम्प्लेक्स ४ वरून अग्नि प्राइम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.
संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, संरक्षण संशोधन आणि विकास संघटनाद्वारे ७ जून रोजी नवीन पिढीच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्नि प्राइमची यशस्वी उड्डाण चाचणी करण्यात आली. डॉ. ए. पी. जे. ओडिशातील अब्दुल कलाम बेटावरून या नवीन पिढीच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज हे मिसाईल लक्ष्याला पूर्णपणे उदध्वस्त करण्यास सक्षम आहे.
अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज असलेल्या अग्नि प्राइम क्षेपणास्त्राने आपले लक्ष्य पूर्णपणे नष्ट करण्यात यश मिळवले आहे. हे क्षेपणास्त्र अग्नि मालिकेतील आधुनिक, मारक, अचूक आणि मध्यम पल्ल्याच्या अणुऊर्जेवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. भारताने अग्नि उपक्रमाअंतर्गत विविध प्रकारच्या क्षेपणास्त्रांची निर्मिती केली आहे.
क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये
-११ हजार किलो वजनाच्या या क्षेपणास्त्रात २ हजार किमी अंतरापर्यंतच्या कोणत्याही लक्ष्याला भेदण्याची क्षमता
-३४.५ फूट लांबीच्या क्षेपणास्त्रावर एक किंवा अनेक स्वतंत्रपणे टार्गेटेबल रीएंट्री व्हेईकल वॉरहेड्स बसवता येतात
-या क्षेपणास्त्राद्वारे अनेक लक्ष्यांंवर हल्ला केला जाऊ शकतो. हे क्षेपणास्त्र उच्च तीव्रतेचे स्फोटक आणि आण्विक शस्त्र वाहून नेण्यास सक्षम आहे
-अग्नि प्राइम हे दुस-या टप्प्यातील क्षेपणास्त्र आहे. यामध्ये १५०० किलो ते ३००० किलो वजनाची शस्त्रे बसवता येतात. हे स्टेज-२ मधील रॉकेट मोटर आधारित क्षेपणास्त्र आहे.