(गणपतीपुळे /वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दीपक दुर्गवळी यांच्या मातोश्री तथा मालगुंड ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या प्रतिभा प्रकाश दुर्गवळी यांचे गुरूवारी 8 जून रोजी सायंकाळच्या सुमारास रत्नागिरी येथे एका खासगी रुग्णालयात आकस्मिक निधन झाले. त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना रत्नागिरी येथे तात्काळ एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचे गुरूवारी सायंकाळच्या सुमारास आकस्मिक निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 65 होते.
प्रतिभा दुर्गवळी या अतिशय प्रेमळ व मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या. मालगुंड ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या म्हणून काम करताना त्यांनी आपल्या वाडीवस्तीबरोबरच संपूर्ण प्रभागात सर्वांगिण विकासासाठी योगदान दिले होते. त्यांच्याच प्रेरणेने व आशिर्वादाने त्यांचे चिरंजीव दीपक दुर्गवळी यांनी राजकीय क्षेत्रात पदार्पण करून मालगुंड गावाचा पहिला थेट सरपंच होण्याचा बहुमान मिळवून आपली सरपंच पदाची कारकीर्द विविध विधायक उपक्रम व लोकोपयोगी विकासकामांनी गाजवून आपल्या आईवडिलांचे नाव रोशन केले. अशा या लोकपरिचित घराण्यातील व्यक्तीमत्व असलेल्या प्रतिभा दुर्गवळी यांचे आकस्मिक निधन झाल्याचे वृत्त समजताच संपूर्ण मालगुंड परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त समजताच मालगुंड परिसरातील सर्व राजकीय पक्षाच्या मंडळींनी आणि अनेक ग्रामस्थांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन अंत्यदर्शन घेतले. तर मोठ्या संख्येने सर्व स्तरावरील नागरिक अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. यावेळी अनेकांनी भेटून मालगुंडचे माजी सरपंच दीपक दुर्गवळी यांचे सांत्वन करून त्यांच्या कुटुंबियांना धीर दिला आहे.कालकथित प्रतिभा दुर्गवळी यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, मुलगी, जावई,सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे