तब्बल १६ हजार हून अधिक हार्ट सर्जरी करून हृदयविकाराच्या रुग्णांना जीवनदान देणाऱ्या गौरव गांधी यांना त्यांच्या हृदयाने मात्र धोका दिला. गौरव यांचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. गुजरातमधील चर्चित कार्डियोलॉजिस्ट गौरव गांधी यांचे निधन झाले आहे. जामनगर येथील रहिवाशी गौरव गांधी यांनी वयाच्या केवळ ४१ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. दुसऱ्यांच्या हृदयावर उपचार करणाऱ्या डॉक्टरचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याने अनेकांना दु:ख अनावर झाले होते.
गौरव गांधी यांनी आपल्या दैनंदिन रुटीनप्रमाणे सोमवारी रुग्णांची तपासणी केली. त्यानंतर रात्री ते जामनगरमधील पॅलेस रोडवरील आपल्या निवासस्थानी परतले. त्यानंतर कुटूंबासोबत रात्रीचे जेवण केल्यानंतर झोपण्यासाठी निघून गेले. दुसऱ्या दिवशी जेव्हा कुटूंबातील लोक सकाळी सहा वाजता उठले तेव्हा त्यांना दिसले की, गौरव यांची तब्येत ठीक नाही. छातीत दुखत असल्याने त्यांना तात्काळ जवळच असणाऱ्या जीजी रुग्णालयात हलवण्यात आले. तोपर्यंत त्यांची शुद्ध हरपली होती. उपचाराअंती तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांचा हॉस्पिटलमध्ये नेत असताना रस्त्यातच मृत्यू झाला. गौरव गांधी यांच्या निधनाची वार्ता शहरात पसरताच रुग्णालयात लोकांची गर्दी जमली. त्यांचे अनेक जुने रुग्ण रुग्णालयात पोहोचले होते.
गौरव गांधी यांनी जामनगरमधूनच एमबीबीएस आणि त्यानंतर एमडीची पदवी घेतली होती. त्यानंतर कार्डियोलॉजीच्या शिक्षणासाठी ते अहमदाबादला गेले होते. जामनगरमध्ये राहूनच ते लोकांवर उपचार करू लागले. काही काळातच त्यांची गणना सौराष्ट्रमधील सर्वात चांगल्या डॉक्टरांमध्ये होऊ लागली. रुग्णांना त्यांच्यावर खूप विश्वास होता. काही वर्षातच त्यांनी १६ हजाराहून अधिक लोकांवर हार्ट सर्जरी केली होती. ते फेसबुक वर ‘हाल्ट हर्ट अटॅक’ अभियानाशी जोडले गेले होते. ते नेहमी सोशल मीडिया आणि सेमिनारच्या माध्यमातून लोकांना हृदयाच्या संबंधीत समस्यांप्रति मार्गदर्शन करत होते.