(कोलकाता)
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजपमध्ये अनेकदा खटके उडतात. राज्यातील प्रश्न असो किंवा केंद्रातील प्रश्न असो, ममता बॅनर्जी अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्र सरकारवर टीका करताना आढळतात. पण, आता ममतांनी सर्व राजकीय मतभेदांना बाजूला सारुन पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनाही आंबे पाठवले आहेत.
गेली १२ वर्षे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान कार्यालयाला हंगामी फळे पाठवली आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता ममता बॅनर्जी यांनी हे आंबे पाठवले. या आंब्यात हिमसागर, लक्ष्मणभोग आणि फजली यासह इतर काही जातींचे चार किलो आंबे एका सुंदर गिफ्ट बॉक्स मध्ये भरून पंतप्रधान मोदींना पाठवले आहेत. पंतप्रधान मोदींशिवाय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनाही आंबे पाठवण्यात आले आहेत. दिल्लीच नाही तर बॅनर्जी यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनाही आंबे पाठवले आहेत. ममता बॅनर्जी यांच्या या आंबा प्रकरणाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.