(दापोली)
३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा, जागतिक सायकल दिवस (३ जून) आणि पर्यावरण दिवस (५ जून) यानिमित्ताने दापोली सायकलिंग क्लब आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दापोली व्यावसाईक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, ४ जून २०२३ रोजी दापोली शहरात सायकल फेरी काढण्यात आली. यामध्ये सर्व वयोगटातील नागरिक सायकलला भगवा ध्वज लावून सायकल चालवत सहभागी झाले होते.
या सायकल फेरीचा मार्ग आझाद मैदान दापोली, केळस्कर नाका, एसटी स्टँड, पोलीस स्टेशन, गाडीतळ, बाजारपेठ, बुरोंडी नाका, सोहनी विद्यामंदिर, श्री शिवस्मारक केळस्कर नाका, आझाद मैदान असा ५ किमीचा होता. सोहनी विद्यामंदिर येथे अमित देवगिरीकर यांनी शिवाजी महाराज, त्यांचे मावळे, राज्याभिषेक सोहळा याबद्दल सखोल माहिती सांगितली. केळस्कर नाका येथील शिवस्मारक येथे पूजा करुन मानवंदना देण्यात आली. पर्यावरण दिनानिमित्त आजूबाजूच्या परिसराची साफसफाई करण्यात आली. सायकल दिवसाचे महत्व, सायकल चालवण्याचे फायदे याबद्दल माहिती देण्यात आली.
सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. या सायकल फेरीचे नियोजन करण्यात सुरज शेठ, प्रशांत पालवणकर, राकेश झगडे, पंकज रेमजे, प्रमोद पांगारकर, मेघनाद कार्ले, श्रीरंग देवधर, उत्तम आंबेकर, शेखर प्रधान, गजानन राठोड, रोहन कोरे, रागिणी रिसबूड, संतोष लयाळ यांचे सहकार्य लाभले. दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक वापर करुया, तसेच आजूबाजूचे पर्यावरण जपून, दापोली अधिक स्वच्छ सुंदर बनवूया असे आवाहन आयोजकांनी केले आहे.