(पुणे)
खंडोबा देवस्थान विश्वस्त पदाच्या निवडीला विरोध करत जेजुरी ग्रामस्थांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. सहधर्मदाय आयुक्तांनी गेल्या महिन्यात जेजुरी मंदिर ट्रस्टवर सात विश्वस्तांची निवड केली होती. त्यातपाच जण जेजुरीबाहेरचे होते. त्याविरोधात जेजुरी खांदेकरी-मानकरी-ग्रामस्थ मंडळाच्या नेतृत्वाखाली जेजुरीकरांनी आंदोलन छेडले होते. विश्वस्त मंडळावर जास्तीत जास्त स्थानिकांचा सहभाग हवा, अशी आंदोलकांची आग्रही मागणी होती. त्याला सर्व पक्षांनी पाठिंबा दिला होता. दरम्यान, जेजुरीत नागरिकांनी साखळी उपोषणही सुरू केले होते. त्याचा आज १३ वा दिवस आहे.
दरम्यान या वादावर आता यशस्वी तोडगा काढण्यात आला आहे. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या जेजुरी खंडोबा मंदिराच्या सात जणांच्या विश्वस्त मंडळात जेजुरी बाहेरील तब्बल पाच जणांनी नियुक्ती केल्यानंतर हा वाद पेटला होता. सहधर्मदाय आयुक्तांच्या या निर्णयावर जेजुरीकरांनी नाराजी व्यक्त केली होती. याविरोधात गाव बंद करण्याचा निर्णयही सर्वानुमते घेण्यात आला होता.
दरम्यान,आंदोलकांच्या वतीने सहधर्मदाय आयुक्तांकडे विश्वस्तांच्या निवडीबाबत पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर आज (७ मे) निर्णय झाला. त्यानुसार आता जेजुरी मंदिर ट्रस्टवर सातऐवजी ११ विश्वस्तांचे मंडळ निवडण्याची सूचना करण्यात आली आहे.
पाच मे रोजी ग्रामस्थांनी सहधर्मदाय आयुक्तांकडे विश्वस्त निवडीबाबत पुनर्विचार याचिका दाखल केली होती. यावर आज सुनावणी घेण्यात आली. आंदोलकांच्या मागणीनुसार जेजुरी मंदिर ट्रस्टवर सातऐवजी अकरा विश्वस्तांची नेमणूक करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यासाठी विश्वस्तांनी घटना दुरुस्त करून संख्या वाढवून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
यामुळे आता जेजुरी देवस्थानच्या विश्वस्त मंडळात स्थानिकांना जास्तीत जास्त संधी मिळणार आहे. या निर्णयाचे जेजुरीकरांनी स्वागत केले आहे. दरम्यान, पुढील नियोजन आणि आंदोलनाबाबत सायंकाळी ग्रामस्थांच्या उपस्थित निर्णय घेणार असल्याचेही आंदोलकांनी सांगितले आहे.