(मुंबई)
वाढदिवसाच्या पार्टीमध्ये बिल देण्यावरून एका मित्राची हत्या केल्याची घटना मुंबईच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार मित्रांना ताब्यात घेतले. या घटनेतील दोन आरोपी अल्पवयीन असून त्यांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. तर, दोन जणांची रवानगी कोठडीत करण्यात आली आहे.
साबीर असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. साबीरने त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या मित्रांना पार्टी दिली. या पार्टीसाठी जवळपास १० हजार रुपये खर्च झाला. साबीरच्या वाढदिवसाला त्याच्या एका मित्राने डीजेची व्यवस्था केली होती. पार्टीनंतर साबीरच्या मित्राने त्याच्याकडे डीजे चे भाडे देण्यासाठी काही पैसे मागितले. मात्र, साबीरने नकार दिला. यामुळे त्यांच्यात वाद वाढला. हा वाद वाढत जाऊन हाणामारीपर्यंत गेला. याच दरम्यान साबीरच्या मित्राने त्याच्या छातीत वार केले. त्यानंतर मित्रांपैकी एकाने साबीरच्या वडिलांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर साबीरच्या वडिलांनी याबाबत पोलिसांना कळवले. मित्रांनी साबीरला रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी तिथे त्याला मृत घोषित केले.
याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले. या घटनेतील दोन आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. तर, शाहरुख आणि निसार या दोन आरोपींना तुरुंगात टाकण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात भादंवि कलम ३०२, ३२३, १०९ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.