(रत्नागिरी)
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरता आपण कटिबद्ध असून याचे दृश्य परिणाम नागरिकांना लवकरच दिसून येतील त्यासाठी नागरिकांनी थोडा संयम ठेवावा. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या वारस नोंदीचा प्रश्न लवकरच निकाली काढण्याच्या दृष्टीने प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी वारस नोंद लावण्याबाबत दिनांक 12 ते 30 जून या कालावधीत तहसीलदारांच्या सहायाने एक विशेष मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या अल्पबचत सभागृहात आज जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार, अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालिका श्रीमती नदिनी घाणेकर, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग श्री. ओटवणेकर आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्ह्यातील विविध तालुक्यातून आलेल्या तक्रारदारांच्या अडचणीची सोडवणूक पालकमंत्र्यांनी अतिशय आस्थेवाईकपणाने केली.
पालकमंत्री पुढे म्हणाले, जिल्ह्यातील सध्या सुरु असलेल्या विकास कामांची प्रक्रिया थांबता कामा नये तसेच जिंदाल उद्योग समूहाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सहकार्याची भूमिका घ्यावी असे आवाहन केले. त्याचबरोबर जिल्ह्यातील विकास कामे सुरू असताना त्याच्या आड येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचा मुलाहिजा ठेवण्यात येवू नये. विकास कामांच्या आड येणाऱ्यांवर पोलीस विभागांनी कडक कारवाई करावी असे निर्देशही त्यांनी या बैठकीत दिले.
जिल्ह्यातील सुमारे पन्नासहून अधिक अर्जदारांनी या जनता दरबारात आपल्या तक्रारी मांडल्या. त्यातील 35 हून अधिक तक्रारींची दखल पालकमंत्र्यांनी तात्काळ घेत जागेवरच तक्रारदारांच्या प्रश्नांची सोडवणूक केली. तत्पूर्वी जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांनी दिनांक 4 नोव्हेंबर 2022 रोजी झालेल्या जनता दरबाराची स्थिती सांगताना ते म्हणाले, मागील जनता दरबारात जिल्हा प्रशासनाला सुमारे 303 अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी 278 अर्ज कार्यवाहीसाठी ठेवण्यात आले होते त्यातील 268 अर्ज प्रशासनाने निकाली काढून संबंधितांना जिल्हा प्रशासनाने न्याय दिला.
नोव्हेंबर २०२२ मध्ये पार पडलेल्या जनता दरबारात शासकीय अधिकाऱ्यांकडून तक्रारदारांचे 278 पैकी 268 अर्ज निकाली काढण्यात आल्यामुळे पालकमंत्र्यांनी शासकीय यंत्रणेची पाठ थोपटली . तसेच प्रादेशिक परिवहन विभागाने रत्नागिरीमध्ये हेल्मेट सक्ती करण्याऐवजी हेल्मेट वापरण्याबाबत नागरिकांचे प्रबोधन करण्यावर भर द्यावा अशी सूचना केली.
या जनता दरबारामध्ये जिल्ह्यातील इतर तालुक्यातील प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी हे दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. या आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी अतिशय दिलखुणासपणाने संवाद साधत नागरिकांना आपलेसे केले. या जनता दरबाराद्वारे संबंधितांचे जागेवर प्रश्न सोडवण्याची पालक मंत्र्यांची ही हातोटी बघून नागरिक अत्यंत समाधानी चेहऱ्याने या जनता दरबारातून परतत होते.
लांजा येथेही जनता दरबाराचे आयोजन
अल्पबचत सभागृह येथील जनता दरबार आटपून आज दुपारी दोनच्या सुमारास पालकमंत्री उदय सामंत यांनी लांजा येथे राजापूर व लांजा तालुक्यातील नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जनता दरबार घेतला यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार, राजापूरच्या प्रांताधिकारी श्रीमती वैशाली माने, लांजाचे तहसीलदार प्रमोद कदम, गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत खेडगे, नगराध्यक्ष मनोहर बाईत आदी उपस्थित होते.
या जनता दरबारामध्ये सुमारे 35 हून अधिक नागरिकांनी आपली निवेदने प्रशासनासमोर मांडली. ही सर्व प्रकरणे निकाली काढून संबंधित विभागाने तक्रारदारांना न्याय द्यावा, असे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिले.