( प्रतिनिधी / रत्नागिरी )
रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उत्तम आणि दर्जेदार भात, बी बियाणे मिळावे त्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी जिल्हयात १० भरारी पथके स्थापन केलेली आहेत. २९ अर्धेवेळ निरीक्षक यासाठी कार्यरत आहेत, या निरिक्षकांमार्फत जिल्हयामध्ये परवानाधारक कृषि सेवा केंद्राची तपासणी करण्यात येत आहे. त्यामध्ये नियमभंग करणार्या जिल्ह्यातील 4 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
कृषी विभागाच्या तपासणीमध्ये काही कृषी सेवा केंद्रामध्ये साठा रजिस्टर न ठेवणे, शिल्लक साठा व दरपत्रक दर्शनी भागावर न लावणे, वेळेत परवाने अद्ययावत न करणे, शेतकऱ्यांना बिल न देणे तसेच परवाना काढलेला आहे परंतु कोणताही व्यवसाय केला जात नाही. अशा बाबी तपासणी दरम्यान आढळून आल्याने सदर परवानाधारक कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. यामध्ये रत्नागिरी १, राजापुर १, चिपळुण २ असे चार ठिकाणी कृषी केंद्रांचे परवाने निलंबीत करण्यात आले आहेत. ही कृषी सेवा केंद्रांवरील कारवाई जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे व गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक सागर साळुंखे यांनी केली.
तरी जिल्हयातील सर्व परवानाधारक कृषी सेवा केंद्र चालकांना कृषी विभागाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे की, बियाणे कायदा १९६६, खत नियंत्रण आदेश १९८५ व किटकनाशके कायदा १९६८ मधील तरतुदीचे पालन करुन कोणताही नियमभंग न करता तपासणी पथकाला नियमानुसार सर्व कागदपत्रे उपलब्ध करुन द्यावी व होणारी कारवाई व आपले नुकसान टाळावे. या मोठ्या कारवाईमुळे कृषी सेवा केंद्र चालकांचे धाबे दणाणले आहेत.