रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या मान्यताप्राप्त युनियनची निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाल्याने या निवडणुकीसाठी कोकण रेल्वेतील तिन्ही संघटना सज्ज झाल्या आहेत. या निवडणुकीकरिता केआरसी एम्प्लॉईज युनियन व रेल कामगार सेना यांची युती झाल्याने या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. दरम्यान, केआरसी एम्प्लॉईज युनियन व रेल कामगार सेना यांनी गेट मिटिंगवर भर दिला आहे. या मिटींगला कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद मिळत आहे.
नॅशनल मजदूर युनियनची आता केआरसी एम्प्लॉईज युनियन व रेल कामगार सेना युतीशी थेट लढत होणार आहे. येत्या ४ व ५-ऑगस्ट रोजी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी जवळपास ५ हजार ३५ मतदार आहेत. या निवडणुकीसाठी २० मतदान केंद्रे राहणार आहेत.
नॅशनल रेल्वे मजदूर युनियन, केआरसी एम्प्लॉईज युनियन, रेल कामगार सेना या तीन युनियन सध्या कोकण रेल्वेत कार्यरत आहेत. त्यातील नॅशनल रेल्वे मजदूर युनियन हि मान्यताप्राप्त युनियन म्हणून सध्या कार्यरत आहे. मान्यताप्राप्त युनियनची मुदत संपत आल्याने आता नवीन मान्यताप्राप्त युनियनसाठी निवडणुकीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.