राष्ट्र सेवादल पूरग्रस्त मदतवाटप आणि सेवापथक श्रमदान उपक्रमांत काल मी आणि अनिकेत लोहिया (मानवलोक, आंबेजोगाई) पेढे कुंभारवाडी (चिपळूण ) येथे पोहोचलो. त्या वाडीत जाणाऱ्या रस्त्याला जवळपास ३०० ते ४०० फुट उंचीची उभी दरड कोसळलेली, दगडमातीचे ढिगारे, घरांच्या भिंतींच्या पार चिंधड्या उडालेल्या, स्लॅबचे घर पार कोलळलेले. या ढिगाऱ्यात घरची भांडी, कळशा बेचिराख संसाराच्या खूणा दर्शवित होती.
२२ जुलै सलग तीन दिवस कोसळणारा पिसाट पाऊस. मांडवकर यांच्या घरामागील डोंगर कडा थेट पर्शराम घाटातील मुंबई – गोवा महामार्गाला टेकलेला. महामार्गाचे चौपदरीकरण कामांने अनेक भागातील पाण्याचे प्रवाह थांबलेले. सकाळी या डोंगरातून पाण्याचा प्रवाह सुरु झाला. घराशेजारुन पाणी वाहू लागल्याचा आनंदात घराच्या पडवीतून फोटो काढत तो स्टेटसला टाकला. आणि काही समजायच्या आतच डोंगर कड्याचा एक भागच महामार्गापासून थेट खाली कोसळला. प्रचंड मोठा गडगडाटी आवाजाने सारा आसमंत हादरला. पावसाचा जोर इतका अफाट होता की समोरचे काही दिसत नव्हते की अन्य आवाज समजत नव्हते. काही तरी भीषण घडल्याची जाणिव कुंभारवाडीत जाणवली. सारा गावच त्या कोसळणाऱ्या पावसात आवाजाच्या दिशेने धावला.
फार भीषण दृश्य होते. महाप्रचंड दरडीने ती पाचही घरे उध्वस्त केली होती त्यात स्लॅबचे मजबूत घरही कोसळले होते. मांडवकर यांच्या घरातील तिन्ही माणसे या दरडीत गडप झाली. अविनाश मोंडकर यांच्या पत्नी , मुलगा आणि आई घरात होती. ह्या तिन्ही व्यक्तीं यांत मृत झाल्या अविनाशचे सारे कुटुंबच उध्वस्त झाले. काही दिवसांपूर्वीच त्याचे वडील वारले. दु:ख आवेगाने पार गलितगात्र झालेल्या अविनाशचे सांत्वन कोण कसे करणार. येथील माजी सरपंच चोपडे फार जागृततेने या कुटुंबांची काळजी घेत आहेत
अविनाश च्या घरासोबतच अन्य चार घरे पुर्ण उदध्वस्त झाली आहेत. त्यांचे पुर्ण संसार उध्वस्त झाले आहेत. येथील वाडीतील आणि गावातील लोकांनी त्यांना आधार दिला आहे.
सध्या चिपळूण आणि परिसरांत धान्य पाणी बाटल्या जीन्नस यांची मोठ्या प्रमाणावर मदत येत आहे. मानवलोक, सेवादल यांच्यावतीने त्यांना काही वस्तूरुपात अत्यावश्यक असणारी मदत करणे हे खूपच मर्यादित आहे. शासन काही मदत देईल यांवर ते अवलंबून आहेत. मात्र त्यांना सध्या अत्यावश्यक आहे सुरक्षित आसरा देणाऱ्या छतांची.
राष्ट्रसेवादल आणि मातृमंदिर देवरुख यासाठी प्रयत्न करत आहे. या पुरग्रस्त परिस्थितीत अनेक घरे आणि छोटे दुकानदार पार उदध्वस्त झाले आहेत. त्यांना पुन्हा उभे करणे आणि आधार देणे शेल्टर देणे हे अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी राष्ट्रसेवादल आणि मातृमंदिर प्रयत्न करत आहे. त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरु असल्याचे अभिजित हेगशेटये यांनी सांगितले. चिपळुणातील पूरग्रस्त भागात अभिजित हेगशेटये आणि त्यांचे सहकारी काम करत आहेत. आतापर्यंत राष्ट्रसेवादल आणि मातृमंदिर देवरुख संस्थेतर्फे त्यांचे मदत कार्य सुरु आहे.